औरंगाबाद : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी अटी आणि शर्थींसह परवानगी दिली होती.त्यामुळेच या सभेवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते.या सभेत राज ठाकरेंकडून नियम आणि अटींचं उल्लंघन केलं आहे का ? या संदर्भात औरंगाबाद पोलिसांनी एक अहवाल तयार केला असून तो पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी एक बैठक सुरू आहे.या बैठकीत राज ठाकरेंवरील कारवाई बाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.त्यानुसार आता औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी याच संदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीत तसेच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातही या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे.राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तानी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील.
आवश्यक वाटल्यास राज ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.