बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांचे वडील बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन यांना २०१९ चा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला.मात्र राजेंद्र पवार हे या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थितीत राहणार नाहीत.राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते आज हे पुरस्कार वितरीत होणार असल्यामुळे राजेंद्र पवार अनुपस्थित राहिले.
ज्यांनी शेतकऱ्यांसाठी अतोनात काम केले,मंत्रिमंडळात असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले त्या महान डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नावे महाराष्ट्राच्या कृषि विभागाकडून दिला जाणारा “कृषिरत्न पुरस्कार २०१९” च्या वितरणाचा कार्यक्रम आज नाशिक येथे महामहिम राज्यपालांच्या हस्ते मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व इतर सन्माननीय मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडतो आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल म्हणजे राज्याचा प्रमुख हे राष्ट्रपती नियुक्त संवैधानिक जबाबदारीचे पद आपले राज्य घटनात्मक पद्धतीने चालावे,आणीबाणी मध्ये काळजीवाहू म्हणून राज्याची काळजी घेण्यासाठी असावे. याच महान राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
रयतेचा राजा,जाणता राजा म्हणून ज्यांना आपण मानतो त्या छत्रपती शिवरायांनी मुघलांची प्रचंड आक्रमणे झेलतानाच शेतकऱ्यांच्या अडचणींकडेही बारकाईने लक्ष दिले.आपल्या आज्ञापत्रात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही शिवू नका, डोल-काठ्या हव्या असतील तर रयतेला राजी करून विकत घ्या,उभ्या पिकात घोडी घालू नका,उंदीर रात्री दिव्याच्या वाती पळवणार नाही याची काळजी बाळगा अशा लोकोपयोगी आज्ञा दिल्या. तर महात्मा फुले यांनी रात्रंदिवस शेतात खपणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांची जाचक शेतसारा,लोकलफंड यावर होणारी लूट थांबून त्यांना पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळावे, डोईवरचे कर्ज कायमचे उतरावे यासाठी शेतीचा धंदा आधुनिक तंत्रज्ञानावर उभारावा अशा उपाययोजना “शेतकऱ्याचा आसूड” या पुस्तकात मांडल्या आणि याच फुले दांपत्याने लोकांचा विरोध पत्करून अंगावर दगड,शेण झेलून सर्वसामान्यांना शिक्षणाची कवाडे खुली केली हे सर्वज्ञात आहे.
परंतु आपल्या महान राज्यपालांनी या थोर व्यक्तींविषयी आताच्या काळात केलेल्या अनऐतिहासिक व पोरकट वादग्रस्त विधानांमुळे माझ्यासह तमाम महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता दुखावली आहे.
त्यामुळे ज्यांना केवळ आमचा इतिहास वादात ढकलायचा आहे,आमच्या अस्मितेचा पोरखेळ करायचा आहे अशा महान व्यक्तीच्या हातून हा पुरस्कार घ्यावा एवढा मोठा मी नाही.उलट या पुरस्काराचा मान राखून तो आज त्यांच्या हस्ते न स्विकारता ज्या कृषी खात्याने दिला त्यांच्याच हस्ते,त्यांच्या कार्यालयात जाऊन स्वीकारणे माझ्यासाठी अधिक प्रशस्त होईल असे राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.