झारगडवाडी ते पिंपळी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील झारगडवाडी ते पिंपळी रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.पंचायत समिती बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.कोटीच्या कामाचा अधिकाऱ्यांच्या संगमतांनी ठेकेदार,सबठेकेदार यांनी अक्षरशः चुराडा लावला आहे.या निकृष्ट होत असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना देऊनही कामाचा दर्जा राखला जात नाही.यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार केली आहे.
रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या मोरया कन्स्ट्रक्शन एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे अशी मागणी निवेदन देत केली आहे.झारगडवाडी ते पिंपळी या रस्त्यासाठी तब्बल १ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत.
नुकतेच पंधरा दिवसापूर्वी या कामाचे भूमिपूजन झाले होते.यावेळी राजेंद्र पवार यांनी काम करत असलेल्या ठेकेदाराला रस्त्यांचे काम दर्जेदार करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या मात्र ठेकेदार आणि सबठेकेदार यांनी पवार यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अंदाजपत्रकानुसार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत झारगडवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी आवाज उठवला आहे.
बातमी चौकट :
बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी वारंवार झाल्या आहेत. यामुळे नागरिकांकडून संबंधित काम करणाऱ्या एजन्सी ला काळया यादीत टाकण्याची अनेक वेळा मागणी झाली आहे. मात्र काळ्या यादीत सोडा तर त्या एजन्सी मालकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत वाढीव कामे देत त्याला बक्षीस दिले जाते हेच सत्य आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जरी नागरिकांनी तक्रारी केल्या आणि दादांनी जरी निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल तो जवळचा असला तरी त्याची गय केली जाणार नाही असे जाहीर भाषणात सांगितले असले तरी अद्याप तक्रारी असणाऱ्या तालुक्यातील एजन्सीवर कारवाई होताना दिसत नाही.