फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
कर्ज फेडण्याचे आश्वासन देत कागदपत्रांचा गैरवापर करून व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकार्यांशी हातमिळवणी करून चुकीच्या व अवैध मार्गाने बँकेतील व्यवहार दाखवत फिर्यादी शासन व सर्वसामान्यांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी दिगंबर आगवणे यांनी केलेल्या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ठाकूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अन्वये स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर फलटण न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पारित केले आहे.
या प्रकरणात संशयित आरोपी यांच्या राजकीय दबावापोटी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने फिर्यादी यांनी त्यांचे वकील ॲड.विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत न्यायालयात धाव घेतली होती.त्यावेळी प्रकरणात पोलिसांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात द्वारे पोलिसांचा तपासाचे आदेश होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद फिर्यादींचे तर्फे ऍड.विजयसिंह ठोंबरे यांनी मांडला युक्तीवाद मान्य करत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए.एच. ठाकूर यांनी पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अन्वये तपासाचे आदेश पारित केले आहे.असे असताना पोलीस प्रशासन मात्र न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याचा आरोप फिर्यादी दिगंबर आगवणे यांनी केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून,देखील पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवत दिगंबर आगवणे यांना या गोष्टीपासून रोखले त्यामुळेच होणारा मोठा अनर्थ टळला.यामुळे आता तरी फलटण ग्रामीण पोलीस आगवणे यांना न्याय देत न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार का ? असा प्रश्न आता फलटणकरांकडून उपस्थित केला जातो आहे.याप्रकरणी फिर्यादी दिगंबर आगवणे यांचे तर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे ॲड.हितेश सोनार व ॲड.दिग्विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले
बातमी चौकट :
स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या फलटण न्यायालयाच्या आदेशाला ९ मे २०२२ पर्यंत स्थगिती देण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार निंबाळकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला ९ मे २०२२ पर्यंत स्थगिती मिळाल्याने हा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातमी कोट :
या प्रकरणात कागदपत्रांचा गैरवापर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून चुकीच्या पद्धतीने व अवैध मार्गाने बँकेतील व्यवहार दाखवत आरोपींनी सगळ्यांचीच फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने,आणि तशा प्रकारे मा.कोर्टापुढे युक्तिवाद केल्याने मा.कोर्टाने १५६ (३) अन्वये पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. ॲड.विजयसिंह ठोंबरे ( फिर्यादींचे वकील )