मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राणा दाम्पत्याने खार पोलिसांवरती गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. आम्हाला जेलमध्ये पाणी दिले नाही, मी खालच्या जातीची असल्याने मला टॉयलेटला जाऊ दिले नाही अशा आशयाचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना याचा अहवाल मागीतला होता. राणा दाम्पत्याच्या या आरोपानंतर आता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक ट्वीट करुन सत्यता मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय पांडे यांनी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन पोस्ट केले आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याने केलेल्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे तपासले जाईल. संजय पांडे यांनी आमदार रवी राणा आणि खासदरा नवनीत राणा यांचा चहा पितानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये चांगली वागणूक देण्यात येत असल्याचे यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.