बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती लोकसभा मतदारसंघातील जिरायती भागात पाण्याची भीषण अवस्था झालेली दिसून येत आहे. दुष्काळाची तीव्रता वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता केवळ शेतीपर्यंत नव्हे,तर पिण्याच्या पाण्यापर्यंत जाणवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील डोंगराळ व दुर्गम भागासह पाणीटंचाई असणाऱ्या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करत या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिले.वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याची विनंतीही यावेळी केली.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.