पाटस : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे पोलीस भरती (PSI ) घोटाळ्यातील फरार असलेल्या आरोपींना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोलनाक्यावर यवत व पाटस पोलीसांनी पाठलाग करीत ताब्यात घेतले.रुद्र गौडा देवेंद्रप्पा पाटील (वय ३७,रा.सौन्नागाव,ता.अफजलपुर, जि.गुलबर्गा), मल्लिकार्जुन सिद्धांना मेळाकुंदी वय ३७, रा.बिदनोर,ता. अफजलपुर, जि.गुलबर्गा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुलबर्गा येथील पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपी हे कर्नाटक पार करून महाराष्ट्राच्या हद्दीतून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे दिशेला जात असल्याची माहिती गुलबर्गा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना कळवली.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबत यवत पोलिसांना व पाटस पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.त्यानुसार शनिवारी (दि.२३)पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पाटस टोलनाका परिसरात तैनात केला.
पोलिसांना मिळालेल्या माहिती प्रमाणे स्विफ्ट कार (केए.३२ पी ६४४३) हे वाहन सोलापूर बाजुकडून येत असल्याचे निदर्शनास आले.त्यावेळी पोलिसांनी सदर स्विफ्ट कार थांबण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांना समोर पाहताच वाहनचालकाने स्विफ्ट कार भरधाव वेगाने घेत टोलनाक्याची लेन तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र,पोलिसांनी पाठलाग करत या वाहनास पकडले. या कारमधील दोघांना ताब्यात घेतले.या दोघांविरुद्ध पोलीस भरतीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी गुलबर्गा येथील पोलीस स्टेशला गुन्हा दाखल होता.यवत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या आरोपींना गुलबर्गा पोलीस निरीक्षक रघुवीर सिंग ठाकूर यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार,पाटस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे,पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भानुदास बंडगर,संजय देवकाते,संदीप कदम,पोलीस नाईक घनश्याम चव्हाण,पोलीस शिपाई समीर भालेराव,गणेश मुटेकर,दत्तात्रय टकले,यवतचे सहा फौजदार बापू जाधव,पोलीस नाईक संदिप देवकर, दत्तात्रय काळे,पोलीस शिपाई मारुती बाराते यांनी केलेली आहे.