शेटफळ तलावाचा वॉल्व नादुरुस्त असल्याने तब्बल वीस दिवसांपासून शेतीचे आवर्तन बंद…
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शेटफळ हवेली येथील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या नादुरुस्त वॉल्वची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.२३) पाहणी केली. दरम्यान,वॉल्वच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून आज (शनिवारी) रात्री पर्यंत उन्हाळी आवर्तन सुरू होईल,अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिली.यावेळी तलावाच्या नादुरुस्त झालेल्या वॉल्वची माहिती जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिली.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी चालू उन्हाळी आवर्तन हे टेल टू हेड पद्धतीने द्या,पाणीपट्टी वसुलीची सक्ती शेतकऱ्यांवर करू नका,अशा सूचना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ब्रिटिशकालीन शेटफळ तलावातून बावडा परिसरातील ११ गावांमधील शेतीला पाणी पुरविले जाते.या गावांमधील शेतीला उन्हाळी हंगामातील आवर्तन दि.५ रोजी सुरू केले होते.मात्र वॉल्व नादुरुस्त झाल्याने गेली २० दिवसांपासून आवर्तन बंद आहे, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेती पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, दादासाहेब घोगरे,प्रतापराव पाटील,तानाजीराव नाईक,पवनराजे घोगरे,सचिन सावंत,अमरदीप काळकुटे, माणिकराव खाडे,शंकरराव शिंदे,संजय शिंदे,सुयोग सावंत तसेच उपअभियंता अनिल नलवडे,शाखा अभियंता के.एस.सावंत,अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.