मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
एका महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी महिलेच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार नोंदवली आहे. बलात्काराची धमकी देऊन संबंधित महिलेने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर मलबार पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण सध्या गुन्हे शाखेला वर्ग करुन तपासाला सुरुवात झाली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान एका परिचित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून खंडणीची मागणी केली. या महिलेने आपल्याकडे पाच कोटी रुपयांचं दुकान आणि एक महागडं घड्याळ मागितल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास बलात्काराची तक्रार करण्याची तसेच सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी या महिलेने दिल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, महिलेने केलेल्या मागणीनंतर धनंजय मुंडे यांनी सदर महिलेला परिचिताकरवी कुरियरच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईल पाठवला होता. पण या महिलेने ५ कोटींसाठी तगादा लावला त्यामुळे अखेरीच धनंजय मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सदर महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.