बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार महिला रुग्णालय बारामती येथे तालुकास्तरीय मोफत आरोग्य मेळाव्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले.आरोग्य शिबिराचे उदघाटन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे याच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराचा एकूण १६५७ रुग्णांनी लाभ घेतला. त्यामध्ये ७२३ लाभार्थ्यांचे डिजिटल आरोग्य ओळखपत्र व ५७ रुग्णांचे आयुष्यमान भारत कार्ड बनविण्यात आले. टेलिकन्सल्टेशन द्वारा ११ रुग्णांची तपासणी केली. शिबिरामध्ये एकूण ६३८ रक्त तपासण्या,२५ ई.सि.जी.,व ९२ एक्सरे काढण्यात आले.
यावेळी ३७ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले असून त्यांची महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.८८ नागरिकांनी अवयव दान आणि देह दान फॉर्म भरुन दिला. योगा आणि आहारासंबंधी ३२ जणांनी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतला असून १८ जणांनी रक्तदान केले, अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली.
शिबिर यशस्विरित्या पाड पाडण्यासाठी वैद्यकिय महाविद्यालय व बारामती शहरातील महात्मा फुले जन आरोग्य योजना पॅनलवरील ४ रुग्णालयांनी तज्ञ डॉक्टर्स व परिचारिका उपलब्ध करुन दिले. शिबिरात सिल्वर ज्युबिली रुग्णालय, महिला रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय, रुई, शारदाबाई नर्सिंग स्कुल येथील अधिकारी, कर्मचारी व परिचारिका विद्यार्थीनी यांनी सहभाग घेऊन मोलाची भूमिका पार पाडली.
शिबिराला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक संभाजी होळकर व वैद्यकिय महाविद्यालय अभ्यागत समितीच्या सदस्या आरती शेंडगे यांनी भेट देऊन प्रत्येक विभागाची पाहणी केली.यावेळी गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल,बालविकास अधिकारी डॉ.माने,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.मनोज खोमणे,डॉ.सुभाष खिल्लारे,वैद्यकिय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.बापू भोई,पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी सुनिल जगताप आदी उपस्थित होते.