मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आता एड गुणरत्न सदावर्ते यांच्या सह त्यांची पत्नी एड जयश्री पाटील व अन्य २ जणांविरुद्ध अकोट शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० ते ४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तब्बल ७४ हजार कर्मचाऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. विजय मालोकार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात मेलोकार यांनी अकोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानंतर आज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत आणखी २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे सदावर्तेंचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काहींनी चपला भिरकावल्या.या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर सदावर्तेंवर गुन्हा नोंदवून अटक केली.