मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली.सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या शंभरहून अधिक आंदोलकांना आज मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सदावर्ते यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य १०९ संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी काल, शुक्रवारी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनावेळी काहींनी चपला भिरकावल्या.या आंदोलनात सहभागी झालेल्यांना सदावर्तेंनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी काल संध्याकाळी सदावर्तेंना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदवून अटक केली. अटकेनंतर आज,शनिवारी सदावर्ते यांच्यासह ताब्यात घेतलेल्या शंभरहून अधिक आंदोलकांना किल्ला कोर्टात हजर केलं.या प्रकरणावर किल्ला कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सरकारच्या वतीनं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.आरोपींवरील कलम गंभीर असून,त्यांना कोठडी द्यावी,अशी मागणी घरत यांनी केली. त्यानंतर कोर्टानं सदावर्ते यांच्यासह आंदोलक कर्मचाऱ्यांना कोठडी सुनावली.
अटक करण्यात आलेले आरोपी तपासात सहकार्य करत नाहीत असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. काल पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेलेल्यांमध्ये खरोखरच एसटी कर्मचारी होते की काही भाडोत्री लोक यात घुसविण्यात आले होते, याचा तपास करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी त्यांनी केली.सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत योग्य भूमीका घेतली नाही.पहिल्या दिवसांपासून कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नव्हत्या.कित्येक कामगारांनी आत्महत्या केली, मात्र सरकारने त्यांची दखलही घेतली नाही, असे अॅड.गुणवर्ते यांच्या यांचे वकिल अॅड.महेश वासवानी यांनी न्यायालयात सांगितले.
न्यायालयाचा निकाल ७ तारखेला आला. त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेपार्ह भाषण केले असे जबाबात म्हटले आहे; मात्र गुन्ह्यातील जबाबात वापरलेले शब्द आणि प्रत्यक्षात गुणरत्न यांनी म्हटलेले वाक्य यात तफावत आहे,असाही युक्तीवाद बचावाच्या वकिलांनी केला.गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे. हायकोर्टात सदावर्तेंवर हल्लाही झालाय. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकिल आहेत. सदावर्तेंकडे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचीही न्यायालयीन प्रकरणे आहेत,असेही गुणवर्तेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.एफआयआरमध्ये पोलिसांनी चुकीचे आरोप लावल्याचाही दावा बचाव पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला.
घटनेच्या वेळी सदावर्ते घटनास्थळी नव्हते तर न्यायालयात होते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. सदावर्ते यांना अटकेपूर्वी नोटीसही देण्यात आली नव्हती, असेही त्यांच्या वकिलांनी न्यायालयाने सांगितले.राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटींच्या वसुली प्रकरणात अॅड. सदावर्ते यांच्या पत्नी अॅड. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती, याचाच रोष गुणवर्तेंवरच्या कारवाईत दिसून येतो आहे, असाही दावा गुणवर्तेंच्या वकिलांनी केला.