बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती एमआयडीसी परिसरामध्ये सुभद्रा मॉल, एमआयडीसी परिसर,महिला हॉस्पिटल या भागांमधून मोटरसायकल चोरणाऱ्या संशयित आरोपी तेजस सदाशिव कदम ( रा.हिंगणेवाडी,ता.इंदापूर जि.पुणे ) याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून काही दुचाकी ताब्यात घेतल्या असून,याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,बारामती एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरींचे प्रमाण वाढल्याने,पोलिसांनी गस्त वाढवली होती.
त्या अनुषंगाने तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असताना सुभद्रा मॉल येथील मोटर सायकल पार्किंगच्या परिसरामध्ये आरोपी कदम हा फिरत असताना मिळून आल्याने,त्याला पोलिस ठाण्याला नेत,चौकशी केली असता,त्याने सुभद्रा मॉल समोरून एक मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल केले.यामुळे आरोपीकडे अधिक चौकशी केली असता,
त्याने आणखी सात गाड्यांची चोरी केल्याचे कबूल केले.चोरी केलेल्या गाड्यांमध्ये बुलेट, यामाहा,हिरो होंडा युनिकॉर्न ,व एफ झेड यासारख्या गाड्याचा समावेश आहेत.आरोपीने ह्या गाड्या पुणे,पिंपरी चिंचवड सह वेगवेगळ्या भागातून चोरी केल्याचे कबूल केले आहे .
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण,पोलीस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक रणजीत मुळीक, अमोल नरुटे,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत यांनी केली आहे.या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलिस नाईक रणजीत मुळीक हे करीत आहेत.