Baramati Breaking : बारामती तालुक्यातील झारगडवाडीत घडला धक्कादायक प्रकार… राजकीय इच्छाशक्तीच्या अभावातून हा प्रकार घडल्याची गावात चर्चा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्याच्या विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती शहर आणि तालुक्यासाठी भरीव निधी देत समतोल विकास साधला जात आहे.मात्र,झारगडवाडी मध्ये असणाऱ्या स्मशानभूमीतील सुविधा याला छेद देणाऱ्या ठरत आहेत.तालुक्यात इतका भरघोस निधी येत असताना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या प्रकारातून समोर येत आहे.बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील स्मशानभूमीत वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी मृतदेहावर मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.त्यामुळे गावकरी आणि नातेवाइकांमधून नाराजीचा सूर उमटत असून, नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कऱ्हानदीच्या शेजारी असलेल्या झारगडवाडीतल्या स्मशानभूमीत कुठल्याही प्रकारची वीज नसल्याने व ग्रामपंचायतीकडून इतर कुठलीही सुविधा नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी गावातील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.संध्याकाळी एखाद्या व्यक्तीचे मयत झाल्यास झारगडवाडीतील स्मशानभूमीत काळोखात मोबाइल टॉर्चचा आधार घेत मयत व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडावा लागत आहे. गावातून स्मशानभूमीपर्यंत रस्त्यावरून येताना वीज नसल्याने काळोखात मृतदेह आणावे लागत आहे. यामुळे गावातील आणि बाहेरगावाहून आलेल्या नागरिकाकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

झारगडवाडी गावामध्ये महावितरण साठी गायरान क्षेत्रामध्ये तीन वर्षांपूर्वी दीड एकर क्षेत्र कुठलाही मोबदला न घेता झारगडवाडी ग्रामपंचायतने महावितरणला सब स्टेशन उभे करण्यासाठी महावितरण च्या नावाने झारगडवाडी ग्रामपंचायतने ना हरकत दाखला दिला.खरंतर ग्रामपंचायत ने जागेच्या बदल्यात महावितरणकडे स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट करून देण्याची मागणी करायला हवी होती. नक्कीच महावितरण ने ही मागणी मान्य केली असती आणि आज स्मशानभूमी कडे जाताना काळोखात जावे लागले नसते.

बातमी चौकट :

याबाबत आता महावितरण कडे गावाच्या हद्दीपासून स्मशानभूमी पर्यत अंदाजे १० ते १२ स्ट्रीट लाईट खांबाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे झारगडवाडीचे ग्रामविकास अधिकारी भिवाजी काळे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *