बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बलात्काराची धमकी देत माझ्याबरोबर लग्न कर,नाहीतर तुझ्या नवऱ्याच्या घरी येऊन फाशी घेऊन आत्महत्या करीन अशी धमकी दिल्याने विवाहितेने विषप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील मोराळवाडी या गावात घडला असून,उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेचे वडील भानुदास लक्ष्मण कारंडे, वय.५२ ( रा.कारंडेमळा, मोराळवाडी,ता.बारामती,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली असून,संशयित आरोपी आकाश मुरलीधर कारंडे, उज्जवला मुरलीधर कारंडे,मुरलीधर कुंडलिक कारंडे यांच्यावर भा.द.वि कलम ३०५,५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादींनी दिलेल्या फिर्यादीनुसार,भावकीतील मुलगा संशयित आरोपी आकाश कारंडे हा विवाहित मुलीची छेड काढत होता.६ नोव्हेंबर २०१९ रोजी आकाशच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.जून २०२० मध्ये टाकळी लोणार गावातील तरुणासोबत मुलीचा विवाह झाला हाेता.मागील सहा महिन्यांपूर्वी विवाहित मुलीच्या आईची आजारपणात देखभाली साठी माहेरी आली होती.
त्यानंतर पुन्हा ती सासरी गेली.१५ मार्च रोजी विवाहितेच्या सासूने मुलगीच्या वडीलांना फोन करत तुमच्या मुलीला आठ दिवस माहेरी न्या,असा निरोप दिला. त्यानंतर वडीलांनी १६ मार्च रोजी तिला माहेरी आणले. दोन दिवसांनी जावयाने त्यांना मोबाईलवर विवाहित मुलगी आणि आकाश कारंडे या दोघांचे फोटो पाठवत यासंदर्भात विचारणा केली.वडीलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने,सहा महिन्यांपूर्वी आईच्या आजारपणावेळी मोराळवाडीत आली असताना आकाशने मोबाईल नंबर व सासरचा पत्ता दिला नाही तर मी तुझ्या भावाला मारून टाकीन,तुझ्या सासरच्या घरी येवून आत्महत्या करेन,अशी धमकी दिली होती.
त्यानंतर दुपारच्या सुमारास आई वडील घरी आले असताना गोठ्यात मुलगी बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले.वडिलांनी तिला तातडीने मोरगावातील रुग्णालयात उपचारासाठी नेले.परंतु,उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.आकाश हा लग्न कर, नाही तर तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले होते.तसेच त्याची आई व वडील हे तु आमच्या मुलासोबत लग्न केले नाही तर तो मरून जाईल, असे म्हणत त्रास देत असल्याचे नमूद केले होते.असे सापडलेल्या चिठ्ठीत लिहलेले आढळून आले आहे. गुन्ह्यातील आरोपीना ताब्यात घेतले असून,या गुन्ह्याचा अधिक तपास वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.