शासकीय बातमी : राज्यात २०२२ ते २०२५ पर्यंत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येणार : मंत्री हसन मुश्रीफ


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी कृषी आधारित बाजारपेठा उपलब्ध करून देणे, ग्रामीण गृहनिर्माणास चालना देणे,ग्रामीण भागात उपजीविका माध्यम निर्मिती करणे अशा विविध लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी राज्यात ‘मिशन महाग्राम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर दिली.

राज्याच्या ग्रामीण भागात शाश्वत सर्वांगिण विकास घडवून आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन केले.यावेळी मुश्रीफ म्हणाले की, मिशन महाग्रामअंतर्गत मानव विकासाच्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करून विकासाचे शाश्वत ध्येय साध्य करण्यासाठी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे.देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यासोबत बहुआयामी भागीदारी विकसित करून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे.

या विकास कामाकरिता देशातील कॉपोरेट तसेच खाजगी कंपन्यांनी जास्तीत जास्त निधी देऊन राज्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्रातील अन्न,वस्त्र, निवारा,आरोग्य,पाणी,शिक्षण व उपजिवीका या क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रीत करून कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शाश्वत विकासा साठी सन २०२२ ते २०२५ या दरम्यान हे मिशन महाग्राम अभियान राबविण्यात येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *