बिबट्या सफारी जुन्नरलाच होण्यासाठी आमदार अतुल बेनके आग्रही..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
वाघोबाला किंवा बिबट्याला पाहण्यासाठी राज्यातील अभयारण्यात किंवा व्याघ्र प्रकल्पांना अनेक पर्यटक भेट देतात.अनेकजण जंगल सफारीचा आनंद लुटतात.मात्र आता पुणे जिल्ह्यातच पर्यटकांना या सफारीचा आनंद मिळणार असून,लवकरच बारामती वनपरिक्षेत्रातील गाडीखेल येथे “बिबट्या सफारी”सुरु होणार आहे.यामुळे पर्यटकांना आता चक्क बिबट्याच्या भेटीला जाण्याची संधी मिळणार आहे.
मात्र ही बिबटया सफारी सुरू होण्याअगोदर जुन्नरकरांनी मात्र याला विरोध केला असून, “बिबट्या सफारी” ही जुन्नरलाच हवी हाच ठेका धरला आहे,यामुळे आता बारामतीत होणाऱ्या “बिबट्या सफारीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.तसं बघायला गेलं तर जुन्नर हा शेतीप्रधान तालुका आहे.जीएमआरटी प्रकल्प असल्याने तालुक्यात औद्योगिककरणं होऊ शकत नाही.जुन्नर तालुका पर्यटन विकासासाठी गती घेत असून, बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो.यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्या विरुद्ध मानव संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. या तालुक्यात ३५० बिबटे असून, प्रत्येक गावात शिवारात वाड्या-वस्त्यांवर बिबटे आढळुन येतात.गेल्या दहा वर्षांत बिबट्या मुळे २०० लोकांचा मृत्यू तर ३५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले असून,नैसर्गिक न्याय भूमिकेतून बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातच व्हावी,अशी मागणी आता आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत केली.
बारामतीत होणाऱ्या बिबट्या सफारीचे क्षेत्र,कोणकोणत्या गावांचा समावेश असणार..
बारामती वनपरिक्षेत्रातील गाडीखेल या गावामधील सुमारे १०० हेक्टर वन क्षेत्रात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार असून नुकतीच राज्य सरकारने याला मंजुरी दिली आहे.या प्रकल्पासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याच्या २०२२-२३ अर्थसंकल्पात तब्बल ६० कोटींची तरतूद केली आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात “बिबट्या सफारी” सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात येत होती.आता प्रत्यक्षात याची सुरवात होणार असून पुणे जिल्ह्याला यामुळे नवी ओळख प्राप्त होणार आहे.
या ‘बिबट्या सफारीमुळे येथील परिसरातील स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल.तसेच यातून होणाऱ्या उत्पन्नाचा वापर बिबट्यांच्या देखभालीसह संवर्धनाकरिता केला जाईल.असे वन विभागामार्फत सांगण्यात आले.गीर अभयारण्याच्या धर्तीवर पुणे वनविभागाद्वारे ‘बिबट्या सफारीचे नियोजन केले जात आहे.यामुळे बारामतीला एक वेगळी ओळख मिळणार असून बिबट्या सफरीमुळे येथील परिसरातील स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.तसेच यातुन होणाऱ्या उत्पन्नाचा वापर बिबट्यांच्या देखभालीसह संवर्धनासाठी देखील केला जाईल.हा प्रकल्प तीन टप्प्यात होणार आहे.
मात्र “बिबट्या सफारी” साठी शिवसेना-राष्ट्रवादीत रंगणार कलगी तुरा…
“बिबट सफारी”हा जुन्नर तालुक्याचा अस्मितेचा विषय असून,बिबट सफारी ही बारामतीला नको ; तर जुन्नरलाच झाली पाहिजे अशी मागणी जुन्नरकरांकडून होत आहे.या मागणीसाठी मेलो तरी हटणार नाही अशी कठोर भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्याने येत्या काळात जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी ह्या मुद्द्यावर मात्र शिवसेना व राष्ट्रवादीत कलगी तुरा रंगणार हे मात्र नक्की..!!
“बिबट सफारी” जुन्नर तालुक्यात व्हावी यासाठी २०१६ पासून शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता.त्यासाठी अनेकदा मंत्र्यांबरोबर,त्या खात्यांच्या मुख्य सचिवाबरोबर बैठका होऊन वनविभागाच्या मुख्य सचिवांनी जागा पाहणी करून आंबेगव्हाण येथील साडे सहा हेक्टर जागा निश्चित केली होती.मात्र ही जागा योग्य नसल्याचा कोणताही अहवाल नसताना,बिबट सफारी जुन्नर तालुक्यात न होता बारामतीत गेल्यामुळे बिबट सफरीच्या विषयाने शिवसेना-राष्ट्रवादीत घमसान होण्याची शक्यता आहे.बारामतीला जंगल सफारी करून त्यात उंट,हत्ती, घोडे सगळे प्राणी आणा ; परंतु आमचा बिबट्या आम्ही तिकडे नेऊन देणार नाही,असे शिवसेनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले.
बातमी चौकट :
‘‘जिल्ह्यात बिबट्यांचा सर्वाधिक वावर जुन्नर येथे आहे.मात्र अलीकडच्या काळात बारामती वनपरिक्षेत्र तसेच,दौंड व इंदापूर या वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढलेले असून मानव-बिबट्या संघर्षात ही वाढ पाहायला मिळते. बिबट्यांच्या पुनर्वसन व संवर्धन याबरोबरच जनजागृतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.’’
उपवनसंरक्षक ( राहुल पाटील )