Political Breaking : नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या अडचणीत वाढ ; मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुलं आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.नीलेश आणि नितेश राणे यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात नितेश राणे आणि नीलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सूरज चव्हाण यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच दाऊद इब्राहिमचे हस्तक असल्याचा आरोप केला होता.त्यांच्या ह्याच आरोपाला आक्षेप घेत चव्हाण यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आझाद मैदानात केलेल्या आंदोलनात नितेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अनिल देशमुख मराठा आहेत म्हणून त्यांना पवारांनी जेलममध्ये जाऊ दिले, पण दाऊदशी संबंध असलेले नवाब मलिक हे मुस्लिम असल्याने पवार त्यांचा राजीनामा घेत नाहीत, अशी टीका केली होती. याच अनुषंगाने नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्यासह शांततेला धोका पोहोचेल असे वक्तव्य केल्याचा दावा करत सूरज चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे.

तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार हेच दाऊदचे हस्तक आहेत, असा आरोप केला होता.शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडून निलेश राणे यांनी समाजात भय निर्माण करुन दंगल घडवण्याचा कट रचल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली काढण्याची भाषा, परब हल्ला प्रकरण,दिशा सालियानची मरणोत्तर बदनामी करण्याचा आरोप यामुळे नारायण आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर हे नवीन गुन्हे दाखल झाल्याने राणे पुत्रांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *