इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
तिघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित करण्याचा धडाका लावला असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं धोक्यात आली आहेत, आणि याच सक्तीच्या वीज बिल वसुलीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. विजेअभावी शेतकऱ्यांची जळून चाललेली पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या विजपंपांचा वीजपुरवठा तात्काळ चालू करावा,ही मागणी घेत भाजपच्या वतीने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर येथे आज सकाळी साडेदहा वाजता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
कोरोनासारख्या जागतिक महामारीत सलग २ वर्षे होरपळून निघालेला शेतकरी आधीच पूर्णपणे अडचणीत असताना,हे वसुली सरकार सक्तीने सतत वीजबिल वसुली करून शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. इंदापूर तालुक्यात नीरा-भीमा नदीचे खोरे,उजनी पाणलोटक्षेत्र, तलाव, विहिरी,बोअर इत्यादींना मुबलक पाणी असताना,येन उन्हाळ्याच्या तोंडावरच वीज बिल वसूलीसाठी हे सरकार वीज कनेक्शन सोडवण्याचे काम करून सरकार शेतकऱ्यांच्या पायावर कुऱ्हाड मारण्याचे पाप करीत असल्याचा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सरकारवर केला.शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असताना,हे सरकार मात्र शेतकऱ्यांना खिंडीत गाठून वीज बिल सक्तीने व नियमबाह्यपणे वसुली करणे निषेधार्थ आहे.आणि याबाबत इंदापूरचे लोकप्रतिनिधी वीज तोडणी मोहिमेला पाठिंबा देत असून,या संदर्भात एकही शब्द बोलत नाहीत,मूग गिळून गप्प का ? असा सवाल देखील पाटील यांनो उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांना चुकीची,अवाजवी बिले देऊन त्यांच्या वसुलीसाठी सक्तीने चालू असलेली वीज जोडणी मोहीम तात्काळ थांबवावी व वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत करावा या मागणीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे.या आंदोलनात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.