बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे झालेल्या घरफोडीत तब्बल १७ तोळे सोने व चांदी असा साडे आठ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील संशयित आरोपी युवराज अर्जुन ढोणे,वय. २६ वर्षे व अविनाश अर्जुन ढोणे वय.२६ वर्षे ( रा. मिरजगाव,खेत माळसवस्ती,ता.कर्जत,जि. अहमदनगर ) यांना तालुका पोलीसांनी व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून,त्यांच्या ताब्यातील तब्बल ९ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४५७, ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील झगडे कॉम्प्लेक्स मधील ८,८३,९०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल असून, तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा हे आरोपींचा संयुक्तरीत्या शोध घेत असताना,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे यांना माहिती मिळाली की,युवराज ढोणे व अविनाश ढोणे यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली असता,त्या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असता,चोरीस गेलेल्या मालाबाबत तपास करत असताना,आरोपींनी चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने निलेश कुंदणमल झाडमुत्था ( रा.डोंगरगण,ता. आष्टी,जि.बीड ) यांना विक्री केल्याचे सांगितले.
त्यावरून झाडमुत्था याला ताब्यात घेत विचारपुस केल्यानंतर अटक करण्यात आली.आरोपींकडे सखोल तपास केला असता, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मालांपैकी १७ तोळे सोन्याचे दागिने असा तब्बल ८ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल व चांदीचे लुपिन नाणे असा वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच आरोपी अविनाश ढोणे याच्याकडून चांदीचे दागिने विकून आलेल्या पैशातून ६१ हजार व अँपल कंपनीचे १२ मोबाइल व एक नवीन बजाज प्लॅटिना मोटर सायकल विकत घेतल्याचे सांगितले.आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता,चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे करीत आहेत. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते,पोलीस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,सहाय्यक फौजदार काळे, पांढरे,राजापुरे, पोलीस हवालदार रविराज कोकरे विजय कांचन,कानुगडे,वाघ, घुले,शेळके,राजू मोमीन,पोलीस नाईक काळे,अभिजित एकशिंगे,स्वप्नील अहिवळे,ठेगळे, चांदणे पोलीस शिपाई प्रशांत राउत, धीरज जाधव,दिपक दराडे यांनी केली आहे.