महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात फलटण तालुक्यातील युवा उद्योजक दिगंबर आगवणे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक असल्याचा गंभीर आरोप करत खासदारांसह कारखाना व पतसंस्थेच्या संचालक मंडळावर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या प्रकारामुळे फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.दिगंबर आगवणे यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे की,आपण गिरवी येथील रहिवासी असून आपला शेती हा व्यवसाय असून, माझ्या कुटूंबियांच्या नावे गिरवी,वाठार निंबाळकर,सुरवडी,नांदल आणि पिंपळवाडी या गावी शेती आहे.शेतीबरोबरच लाकूड विक्री आणि ब्रिकेट तयार करुन कंपन्यांना विकण्याचा आपला व्यवसाय आहे.या व्यवसायाच्या माध्यमातून सन २००७ साली आपला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क आला.
त्यांच्या सुरवडी येथील स्वराज दूध डेअरीसाठी आपण लाकूड पुरवठा करत होतो.तेव्हापासून आपले त्यांच्याशी आर्थिक व्यवहार होत होते.त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्याला स्वराज कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदाचे अमिष दाखवून आर्थिक मदतीची विनंती केल्यामुळे आपण २०१४ साली आपली पिंपळवाडी येथील सर्व्हे नं.६४/४, क्षेत्र १.६२ हेक्टर ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा पुणे कॅम्प) यांच्याकडून ५० कोटी,बँक ऑफ इंडिया (शाखा पुणे) यांच्याकडून ४७.१३ कोटी आणि कॅनरा बँक यांच्याकडून ४५ कोटी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साखर कारखान्यास कर्ज मिळण्याकरीता गहाण ठेवली.ऑक्टो. २०१४ मध्ये नमूद कारखान्याचे व्हाईस चेअरमन पदावर आपली नियुक्ती पत्र देण्यात आले,परंतू कारखान्याच्या व्यवहारात आपण कार्यरत नाही. कारखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर डिस्टलरी प्रोजेक्टसाठी पुन्हा वरील जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडिया(शाखा पुणे कॅम्प) मध्ये गहाण ठेवून ८४ कोटी कर्ज असे एकूण २२६ कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तन्हिी बँकेच्या संमतीने काढले आहे.
त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर यांचा स्वराज इंडिया अॅग्रो हा साखर कारखाना सुरु झाल्यानंतर वीज निर्मितीबाबत तोंडी व्यवहार करुन सिझन चालू असताना निर्माण झालेली विज ही कारखान्यासाठी आणि ऑफ सिझन काळातील वीज महावितरणला विक्री करुन येणारे उत्पन्न दोघात वाटून घेण्याचे ठरले होते.त्यावेळीही त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने स्टेट बँक ऑफ पटीयाला,शाखा वाडे फाटा, सातारा मध्ये मौजे फलटण या गावातील बिनशेती स.नं.८२/९, ८२/१५ नांदल,गिरवी येथील जमीन तारण ठेवून आपण २.५ कोटी रुपये कर्ज काढले.या रक्कमेतील २ कोटी रक्कम ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा गिरवी येथील आपल्या बँक खात्यावरुन आपण रणजितसिंह निंबाळकर यांच्या खात्यावर दि.२० जाने.२०१५ रोजी जमा केली आहे. त्यानंतर दि.१९ मे २०१५ रोजी याच बँकेतील दुसऱ्या खात्यावरुन आपण ६० लाख रुपये निंबाळकर यांच्या खात्यावर जमा केले आहेत.असे एकूण २ कोटी ७५ लाख रुपये कर्ज या प्रकल्पासाठी आपण काढून दिले आहे.त्यानंतर दि.२० नोव्हें.२०१७ रोजी आपल्या आयुर ट्रेडर्स कंपनीच्या अभ्युदय बँकेच्या खात्यावरील ६४ लाख रुपये रक्कम निंबाळकर यांच्या स्वराज ॲग्रो कारखान्याच्या खात्यावर बगॅस खरेदीसाठी आपण पाठविले.परंतू आपल्याला त्या मोबदल्यात बगॅस मिळालेले नाही.निंबाळकर यांनी या कारखान्यातील बगॅस आणि मळीची विक्री दाखवून आपल्या कारखान्याची उलाढाल आणि फायदा दाखवण्यासाठी आपल्याला ७ ते ८ कोटींची खोटी बिले देवून माल विक्री केल्याचे दाखवले.
दि.३१ ऑग.२०१८ रोजी आपली आयुर ट्रेडर्स ही कंपनी जळून खाक झाल्यानंतर खोट्या बिलाचा माल माझ्या कंपनीत दाखवून विमा क्लेम करण्यासाठी रणजित निंबाळकर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपही दिगंबर आगवणे यांनी केला आहे.मात्र बिले खोटी असल्यामुळे आपण ती कंपनीकडे सादर केली नसल्याचेही दिगंबर आगवणे यांनी स्पष्ट केले आहे. निंबाळकर हे चेअरमन असलेल्या स्वराज पतसंस्थेतून सन २०१३ साली त्यांच्या पत्नी जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्याने
आपल्या नावे कर्ज घेतले होते.पुढे सन २०१६-१७ साली त्यांनी याच पतसंस्थेमध्ये आपली सुरवडी येथील शेती सर्व्ह नं.४८/२ ह्या जमिनीचा वाद चालू असल्यामुळे त्याच्यावर वहीवाट व बोझा दिसण्यासाठी केस चालू असताना रणजितसिंह निंबाळकर यांनी ही जमीन गहाण ठेवून १ कोटी रुपये कर्ज घेतले होते.परंतु कर्ज प्रकरणात आपल्या सह्या घेवून ही रक्कम आपल्याला मिळालेली नाही.त्यापैकी परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेमध्ये कारखान्याने भरल्याचे आपल्याला समजले आहे.या कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह निंबाळकर यांनी या भरल्याचे आपल्याला समजले आहे.
या कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह निंबाळकर यांनी या पतसंस्थेद्वारे कलम १३८ एन.आय.अॅक्ट प्रमाणे कोर्टात दावा दाखला केला असल्याचेही दिगंबर आगवणे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.या सर्व प्रकरणांवरुन रणजितसिंह निंबाळकर, स्वराज इंडिया अॅग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे संचालक बॉडी यांच्याविरोधात विश्वासघात,खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकी बाबत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली असून,निंबाळकर विद्यमान खासदार असल्याने त्यांच्याकडून पदाचा गैरवापर करुन आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता असून त्यांच्यापासून आपल्या जिवीतास धोका आहे,असेही दिगंबर आगवणे यांनी आपल्या अर्जात शेवटी नमूद केले आहे.