बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात तसेच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आज बारामतीत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालया समोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.
वीज बिले भरली नसल्याने शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या विरोधात आज राज्यभर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.बारामती देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर राज्य सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब करत वीज बिले माफ करण्याची मागणी केली.यावेळी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन वीज पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी दिला आहे.
यावेळी भाजपाचे भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस अभिजित देवकाते,पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते,पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,शहराध्यक्ष सतीश फाळके, शहर उपाध्यक्ष सुधाकर पांढरे,विजयकुमार देवकाते, मोहन सांगळे,रमेश कांबळे, धनंजय गवारे,पोपट खैरे, भाजपा कार्यालयीन मंत्री रघु चौधर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.