तपासादरम्यान मोठं पिस्टल रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीला बारामती शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.शहर पोलिसांनी शहरातील पाटस रोड वरील देशमुख चौकात ही कारवाई केलेली आहे.देवेंद्र उर्फ बंडू हुकूमचंद यादव, वय.२७ वर्षे मूळ रा.( हंडीया खेडा,ता.खंडवा,जि.खंडवा, मध्यप्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी शहर पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांनी फिर्याद दिली असून आरोपींवर भा.द.वि कलम भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की,पाटस रोडवरील देशमुख चौकात एका इसम अग्नीशस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली असता,तात्काळ शहरातील पाटस रोडवरील देशमुख चौक येथे जात सापळा रचत वेशांतर करून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले.त्याची अंगझडती घेतली असता,त्याच्या जवळ एक विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.पोलिसांनी तीस हजारांचा लोखंडी पिस्टल व ५०० रुपये किंमतीची पाच जिवंत काडतुसे हस्तगत केलेली आहेत.याबाबत अधिक तपास शहर पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे करीत आहेत.तपासा दरम्यान मोठं पिस्टल रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे,पोलीस नाईक दशरथ कोळेकर,कल्याण खांडेकर,तुषार चव्हाण,गौरव ठोंबरे, पोलीस कर्मचारी राणे यांनी केलेली आहे.