सोलापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला आज सांगोला येथून सुरुवात झाली.सांगोला विधानसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचे काम अनेक वर्षे या सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. त्यांनी तपस्वी वृत्तीने काम केले आहे.मात्र त्यांच्यानंतर आता या मतदारसंघात अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव सांगोला मतदारसंघात वाढावा यासाठी प्रयत्न करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
गणपत आबा देशमुख यांनी वर्षांनुवर्षे सांगोल्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवावे यासाठी आबांनी प्रयत्न केला.कालांतराने या भागात टेंभूचे पाणी आले. म्हैसाळचे पाणी आले.आज आबा हयात नाहीत,मात्र दिपक साळुंके या भागात अधिकचे पाणी यावे यासाठी प्रयत्नशील राहतात,असे जयंत पाटील म्हणाले.महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. सांगोल्याच्या सर्व गावांना पाणी मिळावे अशी त्यांची मागणी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात या भागासाठी विशेष बैठक घेतली जाईल व या भागातील जास्तीत जास्त मागण्या दीपक आबांच्या उपस्थितीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.
२०२४ च्या निवडणुकीसाठी आपण सज्ज राहायला हवे, त्यासाठी आपले सैन्य तयार पाहिजे आणि म्हणून बुथकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे.प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी प्लसमध्ये पाहिजे,जर आपण मायनसमध्ये जात असाल तर का मायनसमध्ये जातोय याचा अभ्यास करण्याची गरज आहे,असेही जयंत पाटील म्हणाले.शरद पवार साहेबांच्या प्रत्येक निर्णयाला आपण पाठिंबा दिला आहे.यापुढेही द्याल याची मला खात्री आहे.दिपक आबा यांनी राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवली आहे.या मतदार संघात बदल घडवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.माजी आमदार दिपक साळुंखे यांनी सांगोला मतदारसंघातील विविध विकासकामे व जलसंपदा विभागाच्या कामाची निवेदन सादर केली.
सांगोला तालुक्यातील अधिक गावे पाण्याखाली यावीत यासाठी प्रयत्न करत असून नादुरुस्त बंधारे दुरुस्तीलाही मान्यता दिली असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर,युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आदींसह पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,कार्याध्यक्ष उमेश पाटील,माजी आमदार दिपक साळुंखे,प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड भगीरथ भालके जिल्हा प्रभारी सुरेश घुले आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.