इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील पंचायत समितीमधील यशवंत घरकुल योजनेच्या मंजूर झालेल्या वीस हजारांचा चेक देण्यासाठी पंचायत समितीमधील सहाय्यक कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याला ५०० रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई आज दुपारी शुक्रवार ( दि.१८ ) रोजी केली आहे.या कारवाईमुळे पंचायत समिती विभागात खळबळ उडाली आहे.
अश्विनी गणेश भोंग,वय.३६ वर्षे ( रा.इंदापूर,जि.पुणे ) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारदारांना यशवंत घरकुल योजनेच्या मंजूर झालेल्या वीस हजारांच्या चेक साठी भोंग यांनी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.त्यानुसार पडताळणी केली असता,भोंग यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांच्याकडून ५०० रुपयांची लाच स्विकारताना भोंग यांना अटक केली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पोलीस उपअधीक्षक श्रीमती शितल घोगरे,पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, भूषण ठाकूर, पोलीस शिपाई चालक प्रशांत वाळके यांनी केलेली आहे.