महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपी समीर अल्लाबक्ष शेख( रा.अहमदनगर ) याला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ आणि पशु क्रूरता अधिनियम १९६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानद पशुकल्याण अधिकारी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.या कारवाईत पोलिसांना आणि गोरक्षकांना ५ गोवंशाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४० च्या सुमारास चाकण परिसरातून एका पिकअप टेम्पो (MH.14.AZ 4251) मध्ये गाय आणि बैल भरून कत्तलीसाठी नगरकडे घेऊन जात असल्याची माहिती मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली.स्वामी यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांची मदत घेऊन हा टेम्पो शिक्रापूर येथील चाकण चौकात थांबविला व पोलिसांच्या मदतीने पोलिस ठाणे येथे आणून या टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये २ गावरान बैल,१ गावरान कालवड,१ गिर खोंड,१ जर्सी गाय अशी एकूण ५ जनावरे दाटीवाटीने कोंबून भरलेल्या अवस्थेत दिसून आले.
त्यामुळे बऱ्याच जनावरांना जखमा झाल्या होत्या.या टेम्पोत कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती.पोलिसांनी टेम्पोचालकास त्याचे नाव पत्ता विचारली असता त्याने समीर शेख असे सांगितले, ही जनावरे कुठून कुठे घेऊन जात आहे ? असे विचारले असता त्याने चिंबळी गावात शेलार याने भरून देऊन ती नगर येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे,असे सांगितले.असे फिर्यादीत म्हंटले आहे.ही सर्व जनावरे श्री क्षेत्रपाल प्रतिष्ठान उज्ज्वल गोरक्षण लोणीकंद येथे सुखरूप सोडण्यात आली आहेत.यावेळी गोशाळेने मोलाचे सहकार्य दिले.शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.या कारवाईत प्रतीक भेगडे,हर्षद पारखे,श्रीकांत भाडळे इत्यादी गोरक्षकांनी सहभाग घेतला होता.