मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
मुंबई दहशतवादी विरोधी पथकाने आणि मुंबई पोलीसांनी मोठी कामगिरी केली असून, घातक शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी ११ जणांना ताब्यात घेतले असून, तब्बल १३ पिस्तूल आणि ३६ जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी आता दहशतवादी विरोधी पथकाने तपास सुरु केला आहे.गेल्या काही दिवसांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याचा वापर विविध गुन्ह्यांत होत आहे.अशा शस्त्र तस्करांविरुद्ध महाराष्ट्र एटीएस पथकाने विशेष मोहीम सुरू केली होती. ही मोहीम सुरू असताना मुलुंड येथून काळाचौकी युनिटच्या पोलीस अधिकार्यांनी एका तरुणाला घातक शस्त्रांसह अटक केली होती.
त्याच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर या पथकाने उरण,उल्हासनगर,डोंबिवली आदी वेगवेगळ्या आठ ठिकाणी छापे टाकले होते.या कारवाई मध्ये मुंबई पोलिसांनी १३ देशी बनावटीचे पिस्तूल आणि ३६ जिवंत काडतुसे हस्तगत केले आहेत.या सर्वांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण हे डीलर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते सर्व आरोपी पिस्तूलची खरेदी करत होते,अशीही माहिती समोर आली आहे. आरोपी पिस्तूल का खरेदी करत होते ? या प्रकरणाचा पुढील तपास एटीएस करत आहे अशी माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी दिली आहे.