Breaking News : मुद्दलीच्या तिपटीपेक्षा जास्त पैसे घेऊन देखील व्याजापोटी तीन लाख मागणाऱ्या बारामतीच्या सावकाराला ग्रामीण पोलीसांचा दणका..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बँकांकडून सहज कर्ज पुरवठा उपलब्ध होत नसल्याने किरकोळ गरजांसाठीही खासगी सावकारांच्या हातापाया पडावे लागते.थेट घरापर्यंत पोहोचणारा गरजू म्हणजे जणू काही सावजच आहे,अशा अविर्भावात खासगी सावकार कर्ज पुरवठा करतात. कर्जदाराची जमीन,घर किंवा किमती ऐवज तारण ठेवून मनमानी व्याजाची आकारणी करतात.विशेष म्हणजे सावकारीचा परवाना नसतानाही कायदा धाब्यावर बसवून कर्जदारांची लूट केली जाते, त्यामुळे खासगी सावकारांचा पाश दिवसें दिवस घट्ट होत आहे.कर्जाची गरज सर्वांनाच पडते. मात्र,किरकोळ कर्जासाठी बँका दारातही उभे करून घेत नाहीत,असा सार्वत्रिक अनुभव आहे.

एखादी बँक कर्ज देण्यास तयार झालीच तर कागदपत्रांची पूर्तता करताना कर्जदाराची दमछाक होते. यातून त्याच्या हातात नेमकी कर्जाची किती रक्कम येईल,याबाबतही खात्री नसते.अशावेळी गरजूंना खासगी सावकार हाच जवळचा पर्याय वाटतो.असाच प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडला असून, चार वर्षात खासगी सावकाराला मुद्दलीच्या तिपटीपेक्षा जास्त पैसे देऊनही व्याजापोटी आणखी तीन लाख मागणाऱ्या खासगी सावकार विकास धरमचंद रायसोनी ( रा.वसंतनगर,ता.बारामती, जि.पुणे ) याच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ५०४,५०६,सावकारी अधिनियम कलम ३९,४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फिर्यादी रमेश तुकाराम गावडे,वय.६५ वर्षे ( रा.खटकेवस्ती,ता.फलटण,जि. सातारा ) यांनी सन २०१३ साली बारामतीचा खासगी सावकार विकास रायसोनी याच्याकडून तीन टक्के व्याजदराने दोन लाख पन्नास हजार रुपये घेतले होते,त्यानुसार त्यासाठी तारण म्हणून पवारवाडी गावच्या हद्दीतील गट नं. २६३/१ मधील ४० आर जमीन तारण ठेवली होती.मुद्दलेच्या मोबदल्यात गावडे यांनी रायसोनी याला सन २०१७ मध्ये मुद्दल आणि व्याज असे मिळून आठ लाख सत्तर हजार रुपये म्हणजे चार वर्षात मुद्दलीच्या तिपटीपेक्षा जास्त पैसे रोख स्वरूपात दिल्यानंतरही रायसोनी यांच्याकडून व्याजापोटी आणखी तीन लाखांच्या व्याजाची मागणी होत होती,खासगी सावकार फिर्यादीची तारण दिलेली जमीन पुन्हा माघारी देण्यास तयार नसून फिर्यादीला शिवीगाळ करीत दमदाटी करून अजून तीन लाख रुपयांची मागणी करीत असल्याची फिर्यादीत म्हटंले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *