Breaking News : पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा पुरस्कार जाहीर..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

जिल्ह्यात छायाचित्र मतदार यादी आणि मतदार जागृती उपक्रमा संदर्भात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे विभागातून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आला.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या १२ लाख २३ हजार ४१३ अर्जावर कार्यवाही पूर्ण करण्यात आली.मागील वर्षीच्या महिला मतदारांच्या तुलनेत यावर्षी १ लाख ४८ हजार १५१ महिला मतदारांची नोंदणी झाली. देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रीय व तृतीयपंथी यांच्यासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करून नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.पीडब्ल्युडी मतदारांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत १६ हजार ६५८ ने वाढ झाली.

गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने शहरी भागात विशेष जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ७२० निवडणूक साक्षरता मंडळे स्थापीत करण्यात आली.प्रारुप यादीमध्ये १ लाख १४ हजार ४८१ आणि विशेष मोहिमेत ६५ हजार २६८ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३४९ औद्योगिक आस्थापनांमध्ये मतदार जागरूकता मंचाची स्थापना करण्यात आली.अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जागृतीवर भर देऊन निवडणूक प्रक्रीया अधिक सुविधाजनक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत.या कामगिरीची दखल घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पुणे विभागातून जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *