दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड येथील गट क्र.१९ मधील राज्य राखीव पोलीस बल (SRPF) येथे कुसडगाव येथील पोलीस शिपाई पदाची शारीरिक मैदानी चाचणी सुरू असताना, यावेळी उमेदवाराचे कागदपत्रे तपासत असताना,चाचणीमध्ये एका डमी उमेदवारास आणि परिक्षार्थीला पोलीसांनी पकडले असून प्रकाश बाळू त्रिभुवन (वय. २७,रा.नालेगाव,ता.वैजापूर,जि. औरंगाबाद) असे मूळ परिक्षार्थीचे नाव असून त्याने त्याच्या जागी गजानन किसन ठाकूर ( रा.नलगी बु.ता.भोकरदन,जि.जालना ) हा डमी
उमेदवार पाठवला असल्याने राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे पोलीस निरीक्षक महेंद्र दत्तात्रय कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,दौंड पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी दौंड गट क्र.७ (SRPF) येथे सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेचे आवेदन अर्ज चेक केले जात असताना,प्रकाश त्रिभुवन या परिक्षार्थीचा आवेदन अर्ज तपासत असताना त्याचा फोटो व सही जुळत नसल्याने व त्याच्या जागी कोणीतरी दुसराच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.त्यावेळी पोलिसांनी त्यास विचारपुस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेत कसून चौकशी केली असता,त्याने त्याचे नाव गजानन ठाकुर असे असल्याचे सांगितले व परिक्षार्थीच्या जागेवर मैदाणी चाचणीस डमी बसल्याचे त्याने सांगितले.दोन्ही आरोपींना दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार भरत जाधव हे करीत आहेत.