Breaking News : सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम शत्रुघ्न सिन्हा,कुश सिन्हा यांच्याविरोधात ईडी आणि पुणे पोलिसांत तक्रार..!!


जमीनमालकाच्या मृत्यूनंतर कुलमुखत्यार पत्राचा वापर करून जागा बळकावली..तक्रार दाखल करून घेण्यात बंडगार्डन पोलिसांची टाळाटाळ..

पुणे :महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

कुलमुखत्यारपत्र करून दिलेल्या जमीनमालक व्यक्तीचा मृत्यू झाल्यावरही तो जिवंत असल्याचे दाखवून मौजे वाघोली (तालुका हवेली ,जिल्हा पुणे) येथील जमीन (गट क्रमांक १३३१/१ क्षेत्र १ हेक्टर आणि ५५ आर ) स्वतः व साथीदार यांचे नावावर करून जागा बळकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात सक्त वसुली संचालनालय (ईडी) , पुणे पोलीस उपायुक्त परीमंडळ क्र. २ श्री पाटील व सहायक पोलीस आयुक्त, कॅन्टोन्मेंट उपविभाग, पुणे श्री गवारी यांच्याकडे जमीनमालक संदीप दाभाडे यांनी कागदोपत्री पुराव्यांसह तक्रार केली आहे.जमीनमालक संदीप दाभाडे यांनी सोमवारी पत्रकाद्वारे माध्यमांना याबाबाबतची माहिती दिली.संदीप दाभाडे यांनी रविवारी ईमेल द्वारे बंडगार्डन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ही तक्रार पाठवली.

स्वतः बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर यांनी रविवारी सायंकाळी ही तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने सोमवारी सकाळी दाभाडे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्र. २ पुणे पाटील व सहायक पोलीस आयुक्त,कँट उपविभाग,पुणे गवारी यांची भेट घेतली. तक्रारी दिल्या आणि पोहोच घेतली. याचप्रमाणे सर्व कागदोपत्री पुराव्यासह सक्तवसुली संचालनालय येथे ईमेलद्वारे तक्रार दिली.संदीप दाभाडे यांची वडिलोपार्जित जमीनीचे कुलमुखत्यार पत्र त्यांचे पिता गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम शत्रुघ्न सिन्हा ,कुश सिन्हा यांना २००२,२००४ मध्ये दिले होते.गोरख दाभाडे सन २००७ साली मृत झाल्यावर ते कुलमुखत्यार पत्र कायदेशीररित्या गैरलागू ठरत होते.आणि संदीप दाभाडे आणि त्यांच्या भाऊ बहिण हे वडिलोपार्जित संपत्तीचे आधीच मालक होते व वडील वारल्यानंतर त्याचा वारस हक्क सुद्धा मिळत होता.

वडिलोपार्जित संपत्तीचे संदीप दाभाडे व भाऊ बहिण हे मालक असतांनाही त्यांची परवानगी न घेता व गोरखनाथ दाभाडे मृत झाल्यानंतरदेखील ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन २००९, २०१० मध्ये तयार करून देऊन व त्याचा उपयोग करून सौ. पूनम शत्रुघ्न सिन्हा ,कुश सिन्हा यांनी स्वतःचे व साथीदारांचे नावे त्या जमिनीचे विक्रीपत्र नोंदवले . दुय्यम निबंधक हवेली- ११ यांचे कार्यालयात हे विक्रीपत्रे नोंद्विताना गोरखनाथ दाभाडे हे मृत झाले असतानाही त्यांचे वतीने कबुलायात सुद्धा सौ. पूनम शत्रुघ्न सिन्हा व इतर यांनी दिली आणि स्वाक्षऱ्या सुद्धा केल्या.७/१२ वर फेरफार करतांना महसूल विभागाने त्याच्या नोटिसा दाभाडे कुटुंबियांना दिल्या नाहीत व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, राजकीय लागेबांधे वापरून पूनम शत्रुघ्न सिन्हा,कुश सिन्हा व त्यांचे साथीदार स्वतःच्या नावे करून घेतली.

या जमिनीतील ६०,००० हजार चौरस फूट जमीन सन २००२ -२००४ पासून त्यांनी ती दाभाडे कुटुंबीय यांचे नावावर असतांना त्यांनी गैरकायदेशीरपणे शेतीची जमीन मर्सिडिस कंपनीला शो रूम साठी भाडे कराराने देऊन त्याचे सिन्हा कुटुंबीय घेत भाडे घेत आहेत.शेती अकृषिक उपयोगात असतानाही तिला शेती दाखवून सन २००९ मध्ये गोरखनाथ दाभाडे हे मृत झाले असतानाही त्याचे नावाने अर्ज करून उप विभागीय अधिकारी पुणे यांचे कार्यालायातून शेती खरेदीची परवानगी गैरपणे मिळविली.याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारी देऊन उपयोग झाला नाही,असे संदीप दाभाडे यांनी सांगितले. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानकर यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी तक्रारीतील मोठी नावे पाहून तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. दाभाडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून ही माहिती दिल्यावरही हालचाल झाली नाही.अखेर दाभाडे यांनी सोमवारी सकाळी सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त परीमंडळ क्र. २ यांना भेटून तक्रार दिली.याप्रकरणी ईडीकडे देखील तक्रार केल्याची माहिती संदीप दाभाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *