भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भिगवण येथील भिगवण राशीन रोडवर भुसा वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातांमध्ये वसीम दाऊद शेख (वय. ३८ रा.भिगवण स्टेशन ता.इंदापुर) यांचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला तर जावेद गुलाम हुसेन शेख (वय.४० रा.भिगवण स्टेशन,ता.इंदापुर) हे गंभीर जखमी झाला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील भिगवण राशीन रोडवरुन भिगवण बाजुकडुन राशीन बाजुकडे भुसा वाहतुक करणारा आयशर टेम्पो(एम. एच. २५ ए.जे. ००५५) निघाला होता. तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथे चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने दुचाकीस जोरदार धडक दिली व टेम्पो समोरील इलेक्ट्रीक खांबावर आदळुन पलटी झाला. या अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींना उपचारांसाठी बारामती येथील खासगी रुग्नालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी वसीम दाऊद शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
टेम्पोची इलेक्ट्रीक खांबाला धडक बसल्यामुळे खांब तुटुन त्या ठिकाणी विजेच्या धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला होता. विदयुत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विदयुत पुरवठा खंडीत केला. अपघातामुळे भिगवण राशीन रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. भिगवण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतुक सुरुळीत केली. अपघातांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या भाजी विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.