मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
आम्ही ममता बॅनर्जीसोबत राहणार की काँग्रेससोबत याची चिंता काही जणांना वाटतेय,परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे शरद पवार साहेब चाणक्य आहेत, हे लक्षात घ्या असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते. तशीच परिस्थिती या देशात होणार आहे, असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले.
बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम पवार साहेब करतील.कुणालाही बाहेर काढून आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने पवार साहेब काम करत आहेत,असेही नवाब मलिक यांनी सांगितले.या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापद्धतीने युपीएच्या बैठका व्हायला हव्या होत्या त्या झाल्या नाहीत ही सत्य परिस्थिती आहे आम्हाला या देशात तृणमूल काँग्रेस,सपा,आरजेडी,टीआरएस दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे.काँग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल,असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्यावर असताना त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली.त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. त्यावर पवार साहेबांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.