मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला. महाविकास आघाडी सरकारचा प्रचार आणि प्रसिद्धीबबत चर्चा सुरु आहे.मात्र सरकारची भूमिका “बाते कम,काम ज्यादा” अशी असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला.सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संक्रमण झाले.
मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्य सरकारने राज्यात निर्माण केलेली नाही.यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ,ऑक्सिजन साठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्य सरकारने वेळोवेळी केल्याचे मलिक म्हणाले.गुजरात राज्यात रुग्ण संख्या लपवण्यात आली, उत्तर प्रदेशमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडं नसल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात आले,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.महाविकास आघाडी सरकारने विकासाची कामे कोविडमध्ये थांबवली,मात्र कोणतेही प्रकल्प रद्द केले नाहीत.शिवाय विविध धोरणांवर भर देण्यात आली असे त्यांनी सांगितले.तसेच राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्किल्स युनिव्हर्सिटी सुरु करण्यात आली आहे.बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याने राज्य सरकारने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून बेरोजगारांचा फायदा करुन देण्याचा विचार केला आहे.
ही नवी योजना राज्यात बेरोजगारी संपविण्यासाठी राबविण्यात येईल,असे नवाब मलिक म्हणाले.पुढे राजकीय परिस्थितीवर बोलताना मलिक म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र माजी मुख्यमंत्री काल म्हणाले की,आता आम्ही राज्य सरकार पाडणार नाही तर हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ.त्यामुळे हे सरकार पडणार नाही असे ते आता कुठेतरी ते स्वीकारत आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला. २०२४ साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे, असे सांगत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीची भावना माध्यमांपुढे मांडली.