पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याबाबत आज पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते. तसेच बैठकस्थळी पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुरातत्व संचालक डॉ तेजस गर्ग,प्रा. हरी नरके, विद्यापीठाचे प्रबंधक डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाला आणि इमारतीला साजेसा असा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा. सावित्रीबाईंच्या येणाऱ्या जयंतीदिनी ३ जानेवारी रोजी या पुतळ्याचे अनावरण होईल अशा पद्धतीने सर्व काम पूर्ण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.पुतळा बसवण्याच्या जागेची विद्यापीठ प्रशासनाबरोबर संयुक्त पाहणी केली आहे. त्यानुसार मुख्य इमारतीसमोर पुतळा बसवणे उत्तम ठरणार आहे असे लक्षात आले आहे. कात्रज येथील परदेशी स्टुडीओमध्ये पुतळा बनवण्याचे काम सुरू असून आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. जयंतीदिनी हा पुतळा बसवण्यात यावा

यावेळेस बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले,या स्मारकास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील स्मारके समितीची आणि महानगरपालिकेच्या वारसा स्थळ (हेरिटेज) समितीची ना-हरकत देऊन तात्काळ या कामास सुरुवात करावी. हेरिटेज समितीकडून पुतळ्याच्या कामास ना- हरकत देण्याबाबत हेरिटेज समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांना त्यांनी दूरध्वनीवरुन सूचना दिल्या. त्यावर येत्या ८ डिसेंबर रोजी समितीची बैठक असून यामध्ये या स्मारकाबाबत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ ना-हरकत दिली जाईल असे दळवी यांनी सांगितले.यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या, ना-हरकत देण्याबाबत मंत्री उदय सामंत आणि प्रधान सचिव यांना सूचना दिल्या. पुतळा विद्यापीठाच्या संरक्षित जागेत असल्याने त्यासाठी मानकांमध्ये आवश्यक ती शिथीलता द्यावी, असेही यांनी सूचवले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *