क्राईम बातमी :सोनगाव येथे दारू अड्ड्यावर छापा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना भिऊन नदीत उडी टाकल्याने एकाचा संशयास्पद मृत्यू..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेखळी येथे झालेल्या सभेत अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी अवैद्य दारू विक्री व अवैध धंद्यांवर कारवाईचा सिलसिला चालू ठेवला असून याच अनुषंगाने बारामती तालुक्यातील सोनगाव येथे अवैद्य हातभट्टी विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता, उपविभागीय पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी गेले असता,धरपकड करत असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोनगाव येथे घडली.मंगलेश अशोक भोसले वय.४५ वर्ष ( रा.सोनगाव,ता.बारामती,जि.पुणे )असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.मात्र मयत झालेल्या व्यक्ती अपंग त्या व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्याने,तो पोलिसांना घाबरल्याने त्याने पाण्यात उडी मारल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेत पोलिसांवर देखील हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.मात्र पोलिसांनी याबाबत दुजोरा दिलेला नाही. याबाबत स्थानिक लोकांनी दिलेली माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पोलिस पथकाला सोनगाव येथे अवैध हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती,त्या अनुषंगाने या पथकाने पारधी वस्तीत सुरु असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापेमारी केली.त्यावेळी हातभट्टी विक्री करणाऱ्या लोकांची धरपकड करत असताना,मयत झालेला मंगलेश भोसले याच्या दिशेने पोलीस धावले असता,त्यावेळी घाबरून जाऊन त्याने लगत असलेल्या नीरा नदीच्या पाण्यात उडी मारली.पाण्यात पोहताना दम छाटल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.त्याचा मृत्यू झाल्यानंतर सोनगावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यामध्ये पोलिसांवरही या जमावाकडून हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यामध्ये दोन ते तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक तालुका पोलीस निरीक्षक महेश गावडे यांच्यासह घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली यानंतर संतप्त जमावाची समजूत घालत मृत व्यक्तीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी बारामती मृतदेह नेण्यात आला,दरम्यान या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *