मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
देशावर १५० राज्य करुन ब्रिटीश राजवट मावळत होती.अशा वेळी देशात राहणाऱ्या सर्व धर्मीयांमध्ये एकता,समानता टिकवून ठेवेल अशा संविधानाची भारताला गरज होती.देश एकसंध व्हावा आणि जनतेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व हक्क मिळावेत याचा विचार सुरु होता.देश स्वतंत्र होत असताना संविधान सभेच्या स्थापनेची मागणी जोर धरू लागली.आणि यासाठी विधानसभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली.आणि तिथून खऱ्या अर्थाने संविधान निर्मिती झाली असे म्हणावे लागेल.ज्यांनी हे संविधान आणि घटना लिहली असे भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.
भारत सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा करण्यात आला.संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.मात्र संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.आणि २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले.भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण २ वर्षे ११ महिने १८ दिवसांचा कालावधी लागला.
मात्र असे असले तरी संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली आहे.भारतीय लोकशाही आज,२६ जानेवारी २०१३ रोजी ६३ वर्ष पूर्ण करत आहे.मात्र भारत सरकारसह भारतीय जनतेला या दिनांचा विसर पडत आहे.असे निदर्शनास आले आहे.२६ नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. मुंबईवर २६/११ ला दहशतवादी हल्ला झाल्यापासून हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळत आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली.भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती,माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे,मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत.याबाबत महाराष्ट्र शासनाने यापुर्वी जनतेला २६ नोव्हेंबरला ‘भारतीय संविधान दिन’ साजरा करण्याचे ही आवाहन केले होते.मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये,सर्व स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे.
शासनाने भारतीय संविधानाची माहिती जनतेला करून देण्यासाठी २६ नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन,बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे.आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.
भारताचे संविधान :
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा;
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत