पारवडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (पद्मसिंह गावडे )
बारामती-जैनकवाडी-खडकी जोडणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे,रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत,त्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.त्याबरोबरच नजीक असणाऱ्या बारामती ॲग्रो या कारखान्यास ऊस वाहतूक करणारे चालक,शेतकरी आणि प्रवाशांना खूप त्रास होत आहे. तसेच अपघाताचा धोका देखील वाढला आहे,आणि छोटे किरकोळ अपघात या मार्गावर होत आहेत.याबरोबरच शिर्सूफळ ते भिगवन जोडणारा प्रा.जि.मा ६१ पारवडी आणि सिद्धेश्वर निंबोडी परिसरात प्रवाशांना धोकादायक ठरत आहे.ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. याच मार्गावर असणारा गावडेवस्ती येथील पुल पूर्णपणे वाहून गेला आहे.
पारवडी ग्रामपंचायतने मुरूम टाकून प्रवाशांसाठी तात्पुरता हा रस्ता सुरु केला असुन,या पुलाला जास्त उंची नसून पारवडी मधून जाणाऱ्या खडकवासला कालव्याचे पाणी मदनवाडी तलावात सोडले असता पुल पूर्णपणे पाण्याखाली जातो. आणि मग प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.स्थानिक
नागरिक,सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी याबाबत विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अद्याप प्रशासनाला कसलीच जाग आलेली दिसत नाही.सर्वाधिक मताधिक्याने लोकप्रतिनिधी निवडून देऊन कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही यामुळे जनतेतून नाराजीचा सुर आहे.
मागे प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजीराव नांदखीले यांनी पुलाच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे,लवकरच निविदा काढून काम सुरू करण्यात येईल, पाण्यामुळे आता काम करता येणार नाही असे सांगितले होते. परंतु आता ओढ्याला पाणीही नाही आणि पाऊसही नाही तरीही काम का सुरू होत नाही ? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिसरातील पशुपालक आणि शेतकऱ्यांची मुख्य बाजारपेठ भिगवण आहे.त्यामुळे प्रा.जि.मा ६१ हा रस्ता वर्दळीचा आहे. त्याबरोबरच बारामती ते पुणे सोलापूर महामार्गाला जोडणारा जैनकवाडी खडकी हा मार्ग आहे. त्यामुळे हा ही मार्ग वर्दळीचा आहे. हे दोन्ही रस्ते कायम दुरावस्थेतच असतात.या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी डोळेझाक का करीत आहेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बातमी चौकट :
ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी ग्रामपंचायत स्तरावर डागडुजी केलेली आहे.पुलाचे काम लवकर व्हावे यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावाही केला आहे.
( जिजाबा अशोकराव गावडे ) सरपंच ग्रा.प.पारवडी )
खड्डेविरहित चांगले रस्ते हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दोन्ही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तक्रार अर्ज देऊ. आणि तरीही दखल न घेतल्यास यासाठी मानव संरक्षण समितिच्या वतीने न्यायालयीन लढा देऊ
राम गवंड. (उपाध्यक्ष,बारामती ता.मानव संरक्षण समिति.)
“लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते गावांना भेट देतात. ग्रामीण भागातील लोकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पारवडी शिर्सुफळ गणातून नागरिक सर्व राजकीय आणि पंचायत प्रतिनिधी सर्वाधिक मताधिक्याने निवडून देत आहेत, तरीही या भागात जन प्रतिनिधींचे दुर्लक्ष होते ही खेदाची बाब आहे.”
नागेश सांगळे.( सामाजिक कार्यकर्ता.)