एसटी कर्मचाऱ्यांचा गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा, तर महामंडळ कोर्टात अवमान याचिका दाखल करणार…!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

मागील काही दिवसांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे.एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही एसटी रस्त्यावर येण्याची शक्यता नाही.याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं चित्र निर्माण झाले आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा आज मंत्रालयावर मोर्चा निघणार आहे.यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत.एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत,एसटी कर्मचाऱ्यांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.

दुसरीकडे एस.टी.कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत.एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नसून, चिघळण्याची चिन्ह दिसत आहे.दरम्यान,राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे.राज्यभरात आत्तापर्यंत ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.लातूर,चंद्रपूर,नांदेड गडचिरोली नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.राज्यभरातील १६ विभागातील ४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी गणेश पेठ बस स्थानकावर या कर्मचाऱ्यांनी काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं,त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *