बारामतीत एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

एसटी महामंडळाचे महाराष्ट्र सरकार मध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप यांच्या नेतृत्वात कामगारांच्या बारामती येथील आंदोलनाच्या ठिकाणी नुकतीच भेट दिली व मागण्यांबाबत संपकरी कामगारांशी सविस्तर चर्चा करून या संपाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन व भत्ते अतिशय कमी असून महागाईच्या काळात एवढ्या अल्प वेतनात कामगारांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे अतिशय कठीण झाले आहे.

महामंडळाचे वेतन व त्या मोबदल्यात कामगारांकडून दिली जाणारी सेवा ही तर एक प्रकारची सरकारी वेठबिगारीच आहे, असा गंभीर आरोप विनोद जगताप यांनी या भेटीदरम्यान केला.महाराष्ट्र सरकार मध्ये महामंडळाचे विलीनीकरण करण्याची मागणी अतिशय रास्त असून त्यामुळे फक्त कामगारांनाच नाही तर सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा चांगल्या सोयी मिळतील अशी आशा जगताप यांनी व्यक्त केली व शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन महामंडळाचे सरकार मध्ये विलीनीकरण करावे अशी जोरदार मागणी केली.

कामगारांचे आंदोलन स्वयंस्फूर्त असून त्याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये असा इशाराही यावेळी देण्यात आला.या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष कांतीलाल काळकुटे, संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, उपाध्यक्ष योगेश जगताप, सरचिटणीस ऋषिकेश निकम, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे बारामती तालुका अध्यक्ष जावेद शेख यांचेसह महामंडळाचे कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *