बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
एसटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.राज्यातील २२५ पैकी २२० आगारांमधील एसटी वाहतूक ठप्प आहे. यामध्ये बारामती आगारामधून होणारी वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प आहे. या संपाला राज्यातील विविध कामगार संघटनाकडूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे या आंदोलनामुळे ट्रॅव्हल्स व रिक्षा चालकांकडून मात्र,तिकिटांचे दुप्पट दर आकारले जात असल्याने ट्रॅव्हल्स व रिक्षा चालकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे या मनमानी तिकीट दर आकारणी करणाऱ्या ट्रॅव्हल्स व रिक्षा चालकांवर कोण अंकुश ठेवणार असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.त्यामुळे कालपासून बारामतीसह जिल्ह्यातील लालपरीची धाव थांबली आहे.
बारामती मधील युवा नेते प्रशांत (नाना)सातव यांनी आज संपाच्या पहिल्याच दिवशी बारामती आगारामध्ये जाऊन भेट देवून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला पाठिंबा दिलेला आहे.तर आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यासाठी आपण एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नाही तर खांद्याला खांदा लावून सोबत असणार आहे,अशी ग्वाही सुद्धा यावेळी युवा नेते प्रशांत (नाना) सातव यांनी यावेळी दिली.एसटी कामगारांच्या संपासंदर्भात मुंबईत आज कृती समितीची बैठक होणार आहे.यात संपाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे.दरम्यान,कृती समितीमध्ये नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असून सर्वच आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे.कालपासून राज्यात एसटी वाहतूक जवळपास ठप्पच झाली आहे.
यामुळे बस स्थानकात प्रवाशी थांबून राहिले आहेत. प्रवाशाला एक तर प्रवास रद्द करावा लागत आहे किंवा खाजगी वाहनांनी जावे लागत असल्याचं चित्र दिसत आहे.प्रवाशांना वेठीस धरण्यासाठी नाही तर आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप असल्याची प्रतिक्रीया कर्मचा-यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच या मागची भावना आहे. त्यामुळे संपासारखा मार्ग अवलंबला असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रवाशांनीही एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा विचार करुन सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान,मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचं म्हणत ताशेरे ओढले होते प्रवाशांचे हाल होत असून, कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले तरीही कर्मचाऱ्यांनी हा संप सुरुच ठेवला आहे.उच्च न्यायालयात यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.याशिवाय तोडगा काढण्यासाठी एकूण १७ कर्मचारी संघटनांची बैठकही मुंबईत होणार आहे.