सोलापूर ( पंढरपूर ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या
कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही,असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.मात्र,महाविकास आघाडी मधील मंत्री हे फक्त आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत,असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात ठाकरे सरकारला लगावला.गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे.एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते.परंतु राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे.
त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहेत. आतापर्यंत राज्यात २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.मात्र,आत्तापर्यंत एक ही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही त्यांना कोणतीही मदत केली नाही,असं गोपीचंद पडळकर म्हणाले. आर्यन खानवर बोलताना पडळकर म्हणाले की,दुसरीकडे मात्र हे ठाकरे सरकार मधील मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटकेबाबत प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. हे सरकार गांजा माफियांच्या मागे असल्याचा आरोप आमदार
गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.
अहमदनगर मधील एका चालकाने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.असे देखील पडळकरांनी आवर्जून सांगितले. जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना द्या पोलिसी बळाचा वापर करू नका अन्यथा एखाद्याने जीव गमावला तर त्याला सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची व परिवहन मंत्र्यांची असेल,असा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केला