दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
दौंड तालुक्यातील पाच गुऱ्हाळ चालकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली,यामध्ये मात्र चार गुऱ्हाळ चालकांकडे गुऱ्हाळ चालवण्याचा परवाना नसल्याचे धक्कादायक खुलासे समोर आल्याची घटना घडली आहे.यामध्ये भेसळ करण्यासाठी वापरले जाणाऱ्या पदार्थ जप्त करत गुऱ्हाळ चालकांच्या ताब्यातील पाच लाख सत्तावीस हजारांचा गुळ,तर ४७ हजारांचे भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ असा एकूण ५ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाईमध्ये काही गूळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गूळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले असून याबाबतीत अनेक वेळा कार्यशाळा घेऊन देखील असे चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती व याच अनुषंगाने २२ ऑक्टोबर रोजी दौंड तालुक्यातील पाच गुऱ्हाळ चालकांवर कारवाई केली.अन्न व औषध प्रशासनाने गुराळ चालकांच्या ताब्यातील भेसळीसाठी वापरण्यात येत असलेल्या भेसळयुक्त पदार्थ ताब्यात घेत यामध्ये दहा नमुने तपासणीसाठी पाठविले असून त्यांच्याकडून १५ हजार ४८७ किंमतीचा गूळ,तर १ हजार ३५८ किलो भेसळयुक्त पदार्थ असा साठा जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये समर्थ गुळ उद्योग केडगाव,लक्ष्मी गुळ उद्योग पिंपळगाव कापरे गुळ उद्योग पिंपळगाव,दिलदार मुर्तुजा गुळ उद्योग केडगाव व जानवी गूळ उद्योग कानरखेड या पाच गुऱ्हाळ चालकांवर कारवाई झाली आहे.ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न ) संजय नारागुडे व विधी अधिकारी संपतराव देशमुख विधी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केली.या कारवाईत कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.