शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या,सदाभाऊ खोतांचे शरद पवारांना पत्र…!!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आपल्या नेतृत्वाखाली काम करीत आहे.कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी,चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे.आपल्या सारखे शेतीतील जाणते गुरु असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत.शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे.सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे. गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे.म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्यांने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे.पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते.जी सहजा सहजी मिळत नाही.पण अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे.नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत.तरी आपण या हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी.जेणेकरुन महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल.