डिकसळ : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
कोंढार चिंचोली ते डिकसळ या जुन्या रेल्वे लाइनवर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची अतिशय धोकादायक अवस्था झाली आहे, या पुलाच्या पूर्वेकडील बाजूस कठड्याच्या आतील बाजूस मोठे भगदाड पडलेले आहे व ते वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे.या पुलावरून सतत लोकांची वर्दळ असते. तसेच या पुलाचे भिगवण या बाजार पेठेशी दळणवळण असल्याने सतत वाहनांची वर्दळ असते.हा पूल धोकादायक झाल्याने जीवितहानी व इतर अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यासाठी कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंके यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला असून,मागील दोन दिवसांपूर्वी त्यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा येथील उबाळे यांच्याबरोबर फोन वरून संवाद साधला असता, त्यांनी प्रत्यक्ष येऊन पुलाची पाहणी देखील केली होती.
यामुळे या गोष्टीचे गांभीर्य ओळखून तात्काळ या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळुंके यांनी केली आहे.सध्या उजनी धरण हे १०० टक्के पेक्षा जास्त भरलेले असून,उजनी धरणाचे पाणी पुलाच्या कठड्याबरोबर आहे व पुलाच्या पूर्व बाजूच्या कठड्याच्या आतील बाजूस भगदाड पडलेले असून ते अतिशय धोकादायक आहे.मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना हे माहित असून देखील हे दिसू नये म्हणून त्यावर मुरुमाचा ढिग यावरती टाकलेला आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पुलाच्या दोन्ही बाजूस लोखंडी बॅरिगेट्स त्वरित बसवण्यात यावेत व लोकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव या पुलावरील जडवाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी देखील देविदास साळुंके यांनी केली आहे.
तसेच नवीन पर्यायी पुलाचे काम होईपर्यंत या पुलाची तात्पुरती दुरूस्ती करण्याची मागणी देखील केली असून,सावित्री नदीवरील पुलाची जशी घटना झाली तशी होऊ नये व याप्रकारची घटना टाळण्यासाठी भगदाड पडलेली घटना ही अतिशय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.भविष्यात आपल्या निष्काळजी पणामुळे अपघात झाल्यास किंवा जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी पाटबंधारे कार्यालय जबाबदार राहील असे त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले आहे.
बातमी चौकट :
कोंढार चिंचोली ते डिकसळ या रेल्वेलाइन पुलाची स्थिती धोकादायक झाली असुन,प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी.व लोकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत जड वाहतूक बंद ठेवावी.
देविदास साळुंके ( माजी सरपंच कोंढार चिंचोली )