रस्ते वाहतूक आणि महामार्ग प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग प्रकल्पांसंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली,तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित राहून इंदापूर मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले. यामध्ये इंदापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग लाभला आहे,परंतु भिगवण ते सरडेवाडी दरम्यान काही ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळे शेतीसाठी तसेच वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना दळणवळणासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत.

तसेच इंदापूर शहरालगच्या बायपास रोडवर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे,त्या ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिज होणे गरजेचे आहे.गलांडवाडी नं.१,पळसदेव, डाळज नं.३,वरकुटे बु. ही मोठी लोकसंख्या असणारी गावे आहेत.त्या ठिकाणी दळणवळण करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे संबंधित ठिकाणी भुयारी मार्ग होणे गरजेचे आहे.इंदापूर तालुक्याच्या दुसऱ्या भागातून पालखी महामार्ग जातो.या महामार्गामध्ये मौजे लासुर्णे येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहे.परंतु त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांचा या उड्डाण पुलासाठी मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्व विचार व्हावा अशी मागणी करणारे निवेदन आमदार भरणे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *