शिवसेनेच्या महा रक्तदान सप्ताहात दोन दिवसांत ३९३७ बाटल्या रक्ताचे संकलन…!!


ठाणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

नवरात्रीचे औचित्य साधून आणि राज्यभरात जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान सप्ताहाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहिल्या दोन दिवसांतच ३ हजार ९३७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. केवळ ठाणेच नव्हे तर अगदी कल्याणपासूनच्या रक्तदात्यांनी शनिवारी ठाण्यात येऊन रक्तदान केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या रक्ताच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नवरात्रीचे औचित्य साधून ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचा औपचारिक शुभारंभ शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीच्या माध्यमातून केला.कुठलीही गौरवशाली परंपरा सुरू करणे आणि ती त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असून शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या नवरात्रौत्सवाची गौरवशाली परंपरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवली आहे.

या महारक्तदान सप्ताहाच्या निमित्ताने या नवरात्रौत्सवाला नवे परिमाण लाभले असून ही खरी भक्ती आहे,असे गौरवोद्गार ठाकरे यांनी शुभारंभ करताना काढले. ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शिवसेना ठाणे व पालघर जिल्ह्याच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता रक्तदान सप्ताहाची सुरुवात झाली आणि पहिल्या तासाभरातच परिवहन सभापती विलास जोशी व टीएमटी कर्मचारी युनियनचे पदाधिकारी गणेश देशमुख यांच्या कुशल नियोजनात टीएमटीच्या ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. दिघेसाहेबांनी सुरू केलेला टेंभीनाक्याचा नवरात्रौत्सव हे तमाम देवीभक्तांच्या श्रद्धेचे स्थान,पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या नवरात्रौत्सवाची देवीभक्त वर्षभर आतूरतेने वाट बघत असतात.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत यंदा त्याला समाजकारणाची जोड दिली आहे.गेले दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि त्यामुळे राज्यभरात निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्रीच्या काळात या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.ठाणे,मुंबई,नवी मुंबईतील सुमारे ६५ ब्लड बँका या महारक्तदान सप्ताहात सहभागी झाल्या आहेत.राज्य रक्त संक्रमण शिबिराचे संचालक डॉ. थोरात,ठाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य,जे.जे.महानगर ब्लड बँकेचे डॉ.हितेश पगारे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य या महारक्तदान सप्ताहाला लाभले आहे. शुक्रवारी २३३७ बाटल्या, तर शनिवारी १६०० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

बातमी चौकट :

सध्या राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये रक्ताची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे.त्यामुळे रुग्णांचीही परवड होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अलिकडेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.यालाच अनुसरून यंदा नवरात्रीचे औचित्य साधून महा रक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला आणि त्यानुसार शिवसेना ठाणे व पालघर जिल्हा शाखेच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.रक्तदान हे पुण्याचे काम आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते एकाच्या शरीरातून काढूनच दुसऱ्याला द्यावे लागते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.

एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *