कत्तलखान्यांवर कारवाई करत पोलिसांनी केला तब्बल १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत…!!!


गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्या नंतरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई संगमनेर शहरात झाली आहे.

अहमदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क ..

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शनिवारी रात्रभर ही कारवाई सुरु होती.सहाय्यक फौजदार रफियोद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन पाच जणांवर भा.द.वी कलम २६९ ४२९,महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्याचे कलम ५ (अ),१/९,५ (क),९ (अ) व प्राण्यांना निर्दयीपणाने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे कलम ३,११ प्रमाणे पोलीसांनी वाहीद कुरेशी,मुद्दसर हाजी,नवाज कुरेशी,जहिर अवर कुरेशी,परवेज कुरेशी,या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह पोलिसांनी १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरु झालेली कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरु होती.या कारवाई दरम्यान कत्तलखान्यांच्या परिसरात वारंवार तणावही निर्माण होत होता.काही टवाळखोरांनी पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी दगडे फेकून रस्त्यावरील पथदिवे फोडण्याच्याही घटना समोर आल्या.मात्र पोलिसांनी त्याला न जुमानता जमाव पांगवला व आपली कारवाई सुरुच ठेवली. गेल्या काही वर्षात झालेल्या सातत्याच्या कारवायात यातील बहुतेक कत्तलखाने बंद झालेली असून सध्या पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करुन हे गोमांस मुंबई,गुलबर्गा (कर्नाटक ) मालेगाव व औरंगाबाद सारख्या ठिकाणी गोवंशाचे मांस पुरवले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.या प्रकरणाची गोपनीयता बाळगीत ही कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्या नंतरची राज्यातील सर्वात मोठी कारवाई संगमनेर शहरात झाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *