श्रीराम कारखाना गाळप क्षमता प्रतिदिन ५ हजार मे. करणार तर अर्कशाळेत इथेनॉल निर्मिती प्लॅटची उभारणी करणार…!!


श्रीराम सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न….

फलटण : विकास बेलदार

श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेला श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि अर्कशाळा दोन्ही संस्था चालविण्यास देणे,श्रीरामची गाळप क्षमता प्रतिदिन ५ हजार मे.टन करणे,अर्कशाळेच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती प्लॅन्ट उभारणी,ऊस विकास निधीतून मार्गदर्शन व खते यासह ड्रीपद्वारे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. श्रीराम सहकारी साखर करखाना ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. ३० रोजी ऑनलाइन संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे होते. महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सह अनेक सभासद या सभेत ऑनलाईन सहभागी झाले होते, तर आ.दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, विश्वासदादा गावडे, तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, मोहनराव नाईक निंबाळकर, प्रा.भीमदेव बुरुंगले, अशोकराव पवार, व्हा.चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक सी.डी.तळेकर व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्या सह काही सभासद श्रीमंत मालोजीराजे बँक सभागृहात उपस्थित होते.

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.हुपरी या दोन सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या भागीदारी संस्थेने गेली १५ वर्षे श्रीराम सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवून आर्थिक गर्तेत रुतलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन केले असल्याचे स्पष्ट करताना, तालुक्यातील ऊसाचे वाढते क्षेत्र व वेळेवर गाळप होण्यात ऊस उत्पादकांची होणारी कुचंबना टाळण्यासाठी श्रीरामची गाळप क्षमता वाढविणे आवश्यक असून अर्कशाळेने इथेनॉल निर्मिती केल्याशिवाय तिचा लाभ सभासद शेतकऱ्यांना मिळणार नसल्याने आणि या गोष्टींसाठी निधीची उभारणी करताना श्रीरामच्या शेअर्सचे नक्त मूल्य अद्याप पॉझिटीव्ह नसल्याने ही जबाबदारी भागीदारी संस्थेवर सोपविण्यासाठी करार मुदत वाढ गरजेची असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सभासदांनी सदर विषय एकमताने मंजूर केला.

आतापर्यंत भागीदारी संस्था केवळ साखर कारखाना चालवीत असल्याने अर्कशाळेच्या माध्यमातून स्पिरिट व मद्य निर्मिती करण्यात आली तथापी तेथेही मद्य निर्मिती ऐवजी इथेनॉल निर्मिती अधिक फायदेशीर ठरेल व त्याचा सभासदांना लाभ देता येईल या विचारातून अर्कशाळे सह कारखाना भागीदारी संस्थेला चालविण्यास देवून इथेनॉल प्लॅट उभारणी जबाबदारी त्यांच्या वर सोपविण्यात आल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. ऊस विकास निधीचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक झाला पाहिजे, त्याच बरोबर गाळप क्षमता वाढविताना तालुक्यात पुरेसा आणि एक वर्षात गाळपास येईल अशा ऊसाचे उत्पादन आवश्यक असल्याने आता यावर्षी पासून आपण स्वतः, चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ या प्रश्नात लक्ष घालणार आहोत, ऊस उत्पादकांना केवळ खते, बेणे देण्यावर न थांबता यापुढे ऊसाची योग्य प्रकारे लागण, त्याची व्यवस्थित वाढ यासाठी खते, बियाणे मार्गदर्शनाबरोबर सिंचन सुविधेसाठी ठिबक ( ड्रीप इरिगेशन ) सिंचन सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

कारखाना गाळप क्षमता वाढ, अर्कशाळेत इथेनॉल निर्मिती करताना सध्याच्या २८०० ते ३००० मे. टन प्रतिदिन गाळप क्षमता वाढवून ५ हजार मे. टन करताना केनयार्डचा विस्तार करण्यासाठी जागेचा प्रश्न कसा सोडविणार यावर बोलताना तोडणी वाहतूक संस्थेची १० एकर जागा शेजारी असल्याने ती ताब्यात घेऊन त्याक्षेत्रावर केनयार्डचा विस्तार करण्याची योजना असल्याने ऊस वाहतुकीच्या वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, ऊस वजन काटे अत्याधुनिक पद्धतीचे व जादा क्षमतेचे बसविण्यात येत असून तेथपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष ऊस वजन पाहता येईल, तसेच ऊस भरलेले वाहन आत येताना त्याची नोंद होणार आहे संपूर्ण पारदर्शी यंत्रणा उभरण्यात येत असल्याचे डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.

नियमाप्रमाणे ऊस आल्यापासून १५ दिवसात पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे बंधन असले तरी आतापर्यंत १४ व्या दिवशी एफआरपी प्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केली असून यापुढेही त्यामध्ये कसली अडचण येणार नाही याची ग्वाही देत कामगार, तोडणी वाहतूक ठेकेदार वगैरे सर्वांचे पेमेंटही वेळेत अदा करण्यात आल्याचे सांगून त्यामध्येही यापुढे बदल होणार नसल्याची ग्वाही डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली. कारखान्याचे शेअर भांडवल वाढविण्यासाठी शासनाने राज्यातील सर्वच साखर कारखान्याचे शेअर्सची किंमत १० हजार ऐवजी १५ हजारे केली असल्याने पोट नियम दुरुस्तीचा प्रस्ताव सभेसमोर ठेवला आहे, सदर वाढीव रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून टप्प्या टप्प्याने घेतली जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत सदर पोट नियम दुरुस्तीस मान्यता देण्याचे आवाहन डॉ. शेंडे यांनी करताच सदर ठराव एकमताने संमत करण्यात आला. श्रीराम कारखान्याचे प्रेरणास्थान श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब आणि संस्थापक चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे पूर्णाकृती पुतळे कारखाना कार्यस्थळावर उभारण्याचा माजी सभापती शंकरराव माडकर यांनी मांडलेला ठराव या सभेत एकमताने संमत करण्यात आला.

प्रारंभी कारखान्याचे सभासद, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, देशाच्या सीमेवर लढताना शहीद झालेले जवान वगैरेंना श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब, श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब, माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन अभिवादन केल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु झाली. कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सभेची नोटीस वाचन केल्यानंतर त्यावरील एकेक विषय सभेसमोर ठेवून त्यावर चर्चा झाल्यानंतर सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. माजी संचालक डॉ. शिवाजीराव गावडे व अन्य सभासदांनी ऑनलाइन सहभागी होऊन काही प्रश्न उपस्थित केले, त्यांना श्रीमंत संजीवराजे व डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी समर्पक उत्तरे देऊन सभासदांचे समाधान केले. संचालक संतोष खटके यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व सभेचे सूत्र संचालन केले तर संचालक सुखदेव बेलदार पाटील यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *