फलटण : प्रतिनिधी विकास बेलदार
श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेतील केवळ ५ लाखांच्याच नव्हे बँकेतील कितीही मोठ्या किंबहुना संपूर्ण ठेवी पूर्ण सुरक्षीत असल्याची ग्वाही देत आता बँक सर्वार्थाने सुरक्षीत आणि मूळ उद्देशाप्रमाणे छोट्या व गरजू व्यक्तिसह कितीही मोठ्या कर्जाची पूर्तता करण्याइतपत सक्षम, सुदृढ़ आणि रिझर्व्ह बँकेसह सहकार कायद्यातील सर्व नियम, निकषांची पूर्तता करून ऑडिट वर्ग ‘अ’ सह सक्षम बँक झाल्याचे प्रतिपादन बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या येथील मुख्य कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, सर्व विषय एकमताने संमत करण्यात आले. अध्यक्षस्थानी बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश गांधी होते.यावेळी आ.दिपकराव चव्हाण, महानंदचे व्हा. चेअरमन डी. के. पवार,फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्यासह संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सभासदांनी ऑनलाइन सहभागी होऊन आपली मते मांडली.
रिझर्व्ह बँक किंवा सहकार कायद्यातील तरतुदी उपयुक्त व मार्गदर्शक असल्याने त्याचा स्वीकार करुन त्या मार्गाने योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली कारभार चालविल्यास सहकारी संस्था उत्तम ठरतात हे आपण गेल्या काही वर्षात प्रत्यक्ष अनुभवल्याचे नमूद करीत श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या प्रेरणेने माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी ४०/४५ वर्षापूर्वी अधिक व्याजदराने कर्ज घेऊन आर्थिक गरज भागविणाऱ्या छोट्या कुटुंबाचा विचार करुन या बँकेची स्थापना केली आहे. या कर्जदारांना झटपट कर्ज मिळावे व अधिक व्याजाचा भार सोसावा लागू नये ही भावना त्यामागे होती, त्याच विचारांचा स्वीकार करुन छोट्या कर्जदारांना प्राधान्याने अर्थसहाय्य करतानाच, बदलत्या परिस्थितीत बँक चालविताना मोठ्या उद्योगांनाही अर्थ पुरवठा करुन बँक अधिक सक्षम व सुदृढ करण्याची ग्वाही यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांनी स्पष्ट शब्दात दिली.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराजसाहेब ) आणि बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राध्येश्यामजी चांडक यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या समवेत योग्य विचार विनीमय करुन बँक चालविताना बँक अधिक सक्षम व आर्थिक दृष्ट्या भक्कम करण्यात यश आले असून आगामी काळात बँक गुंतवणुकीचे योग्य मार्ग व योग्य कर्जदारांना अर्थसहाय्य करुन अधिक सक्षम तर होईलच परंतू त्याच बरोबर ठेवीदार व सभासदांचे हित जोपासणारी सर्वोत्तम बँक असेल याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांनी दिली.गेल्या ४६ वर्षात अनेक अडचणी, संकटावर मात करुन संस्थापक चेअरमन, माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी ठरविलेल्या उद्दिष्टांप्रमाणे कामकाज चालविताना जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर जाऊन १५ शाखांच्या माध्यमातून ठेवीदार, कर्जदार , खातेदार, सभासद यांना आवश्यक सेवा सुविधांद्वारे दिलासा देण्यात बँक यशस्वी झाली, दुर्बल घटकांना तातडीने व योग्य व्याज दरात अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणारी बँक ही बिरुदावली बँकेने आजही जपल्याचे गौरवोद्गार आमदार दीपकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
गेल्या २/३ वर्षात बँक अंतर्बाह्य बदलण्यात उत्तम यश प्राप्त होत असून पहिल्या टप्प्यात एनपीए कमी केल्यानंतर थकीत कर्ज वसूलीसह अन्य बाबी संचालक मंडळ, सभासद व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या एकसंधतेमुळे शक्य झाल्या आहेत, नव्या स्वरुपात बँक उभी करताना रिझर्व्ह बँक व सहकार कायद्यातील तरतुदी, रिझर्व्ह बँकेचे नियम, निकष आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले तर कोणत्याही ठेवीदाराच्या, कितीही मोठ्या ठेवींना कधीही बाधा पोहोचणार नाही, अन्य बाबीतही कसलीच अडचण येत नसल्याचे प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर आपण त्याच मार्गाने कामकाज चालवून बँक यशोशिखरावर सर्वोच्च स्थानी निश्चित पोहोचवू याची ग्वाही शिरीष देशपांडे यांनी दिली.प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढा यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब, श्रीमंत सौ.लक्ष्मीदेवी राणीसाहेब व श्रीमंत शिवाजीराजे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व अभिवादन केल्यानंतर दिपप्रज्वलनाने सभेची सुरुवात करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेची विषय पत्रिका वाचून त्यावरील एकेक विषय सभेसमोर ठेवून त्यावर चर्चा झाल्यानंतर सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. अहवाल सालात दिवंगत झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सभासद व अन्य मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बँकेच्या एकूण १५ शाखा असून २८ हजार ८५२ सभासद, ८ कोटी ८८ लाख ६ हजार भाग भांडवल, २३२ कोटी ४१ लाख ४४ हजार रुपयांच्या ठेवी, १२९ कोटी ४ लाख ४५ हजार रुपयांची कर्जे, ११९ कोटी १५ लाख १८ हजार रुपयांची गुंतवणूक आणि ऑडिट वर्ग ‘अ’ असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा यांनी निदर्शनास आणून दिले.